Dilip Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dilip Mane : दिलीप मानेंची नेमकी भूमिका काय? स्वतः काडादीसोबत, तर समर्थकांचा देशमुखांना पाठिंबा!

Assembly Election 2024 : मोहोळ विधानसभा मतदारसंघातील दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांना महायुतीचे विद्यमान आमदार यशवंत माने यांचे काम करण्याचा आदेश मिळाला आहे, त्यामुळे दिलीप माने हे जरी काडादी यांच्यासोबत प्रचारात उतरले असले तरी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मात्र महायुतीच्या प्रचारात दिसून येत आहेत

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 November : विधानसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानंतर काही दिवस नाराज असलेले माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. ते स्वतः काडादी यांच्या प्रचारात उतरले आहेत. मात्र, याच मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांनी भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांना महायुतीचे विद्यमान आमदार यशवंत माने यांचे काम करण्याचा आदेश मिळाला आहे, त्यामुळे दिलीप माने हे जरी काडादी यांच्यासोबत प्रचारात उतरले असले तरी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मात्र महायुतीच्या प्रचारात दिसून येत आहेत, त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार माने यांची नेमकी भूमिका काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) हे इच्छुक होते, त्यांची उमेदवारी काँग्रेसच्या यादीतून जाहीरही झाली होती. मात्र, काँग्रेस पक्षाकडून आलेला असतानाही शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म देण्यात आला नव्हता, त्यामुळे माने आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते हे काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात नाराज होते. या नाराजीतूनच दिलीप माने हे काही दिवस राजकीय घडामोडींपासून लांब होते. मात्र वरिष्ठांच्या आग्रहानंतर ते निवडणुकीत सक्रिय झाले.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून (Solapur South Constituency) दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांतील प्रचारात ते सहभागीही झाले होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घडामोडींमुळे माने हे एकीकडे, तर त्यांच्या समर्थकांनी भाजपचे सुभाष देशमुख यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला.

माजी आमदार दिलीप माने यांना मानणारा मोठा गट उत्तर सोलापूर तालुक्यातही आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावे ही मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहेत. या मतदारसंघात महायुतीकडून आमदार यशवंत माने हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावांतील माने समर्थकांना आमदार यशवंत माने यांचे काम करण्याचा आदेश मिळाल्याची माहिती आहे, त्यामुळे माने यांचा काडादी यांच्यासोबत जाण्याचा निर्णय असला तरी समर्थक मात्र महायुतीसोबत असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT