Satara, 21 March : प्रचंड राडा आणि नाट्यमय घडामोडीनंतर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली आहे. या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये एक गोष्ट दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली आणि कोरेगाव मतदारसंघातील शिवसेनेच्या दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपसोबत गेले, त्यामुळे आमदार महेश शिंदे नेमके कुणाचे? शिवसेनेचे की भाजपचे? असा सवाल उपस्थित होत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २७, राष्ट्रवादी काँग्रेस २०, तर शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी एक जागा मिळाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोचली होती.
भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा डाव टाकत जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना दिली होती. भाजपने बहुमतासाठी टाकलेला तो गेम होता. पण त्यात शिवसेना पुरती अडकली. कारण शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या गळाला आपसूकच लागले.
आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेच्या दोन सदस्यांनी भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजू भोसले यांना मतदान केले. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन सदस्यांनी भाजपला मदत केली, तसेच राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदानात सहभाग घेता आला नाही, त्यामुळे भाजपने ३३ मते घेत आपला जिल्हा परिषद अध्यक्ष केला.
आता निवडीनंतर शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे. कारण साताऱ्यात भाजपच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली होती. त्यामुळे एकसंघ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्याच्या तयारीत होती. मात्र, भाजपने शिंदेसेनेच्या आमदाराला गळाला लावत शंभूराज देसाईंना कात्रज घाट दाखवला.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत साताऱ्यात प्रचंड राडा झाला. त्यात पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई यांना पोलिस आणि भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचे देसाई आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, त्यात सर्वांना अस्मान दाखवत भाजपने जिल्हा परिषदेची खुर्ची हस्तगत केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.