

Solapur, 21 March : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री म्हणून सोलापूरची जबाबदारी सातारा जिल्ह्यातील जयकुमार गोरेंवर सोपवली होती. मोहिते पाटलांसारख्या बड्या राजकीय कुटुंबाला केवळ माळशिरसपुरते सीमित ठेवून आणि राष्ट्रवादीचे गड उद्ध्वस्त करत सोलापूर जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली. सर्वांत महत्वाचे म्हणजे सातारा जिल्ह्याच्या फलटणमधील रामराजे गटाचे केडर मोडकळीस आणण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या सर्वांवर कळस म्हणजे बहुमत नसतानाही सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसविला. त्यामुळे फडणवीसांनी सोपवलेली अर्धी लढाई गोरेंनी जिंकली असून आता फक्त माढ्याची लढाई मारणे बाकी आहे.
लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबाने बंड केल्यानंतर माढ्याची जागा भारतीय जतना पक्षाला गमावावी लागली होती. माढा परत मिळविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात होते. त्यामुळेच महायुतीचे सरकार सत्तेवर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी ‘डॅशिंग’ जयकुमार गोरेंवर सोपवली होती. विशेष म्हणजे त्यांच्याकडे ग्रामविकास सारखे महत्वाचे मंत्रिपदही दिले.
पालकमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच दौऱ्यात त्यांना मोहिते पाटील यांच्यासंदर्भाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मी कोणाचेही राजकारण संपवायला जिल्ह्यात आलो नाही तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली होती. ती जबाबदारी पूर्ण होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. म्हणजेच माढ्यासह सोलापूर आणि सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून या ठिकाणी भाजपची सत्ता प्रस्थापित करणे, हा हेतू साहजिकच त्यामागे असणार आहे. त्याचदृष्टीने गोरेंनी कामकाजाला सुरुवात केली.
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील ताकदवान असलेल्या राष्ट्रवादीच्या तीन माजी आमदारांना भाजपसोबत घेतले, त्यामुळे पहिल्याच फटक्यात अर्धी राष्ट्रवादी खिळखिळी करून टाकली. सांगोल्यात ऐनवेळी शेकापचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढविणे अंगलट आले, त्यामुळे सावध झालेल्या गोरेंनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत रणनीती बदलली.
स्थानिक नेत्यांशी तडजोडी करत, तर काही ठिकाणी संबंधित नेत्यांना आघाडी करून लढवायला भाग पाडून भाजपचा फायदा होईल, अशी ‘स्ट्रॅटेजी’ पालकमंत्री गोरे यांनी राबवली. जिल्ह्यात भाजपच्या बाजूने राजकारणातील प्यादी सरकवत असताना माळशिरसमध्ये मात्र कोणतीही तडजोड केली नाही. मोहिते पाटील यांना जेरीस आणण्यासाठी अगोदर अकलूज नगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकही माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली.
मोहिते पाटलांची इच्छा असूनही त्यांना सोबत न घेण्याची खेळी खेळली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील माेहिते पाटलांचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचे केडर मोडीत काढण्यात गोरेंना यश आल्याचे मागील तीन निवडणुकांत दिसून आले आहे. हे करत असताना मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय आमदार, माजी आमदार आणि नेत्यांना भाजपसोबत जोडत त्यांचा गट खिळखिळा करण्यात त्यांनी बाजी मारली आहे. आता केवळ माढा लोकसभा मतदारसंघ जिंकणे बाकी आहे, त्यासाठी लोकसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण या मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांची केडर गोरेंनी बऱ्यापैकी पोखरले आहे.
एकीकडे सोलापूर जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप करत असताना गोरेंचे मित्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत करत दोस्तीही निभावली आहे. फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बहुमत असतानाही निंबाळकरांनी राष्ट्रवादी फोडत भाजपचा सभापती केला. यासारख्या अनेक प्रकरणांत गोंनी निंबाळकरांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून येते.
सर्वांत महत्वाचे म्हणजे सातारा जिल्हा परिषदेत बहुमत नसतानाही भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी आपला माणूस बसवला आहे. त्या वेळी सभागृहात प्रचंड गदरोळ झाला. पण शेवटी निकाल भाजपच्या बाजूने लावून घेण्यात गोरेंनी बाजी मारली. साताऱ्यातील राजकीय यशामागे ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे यांचाच ब्रेन असल्याचे लपून राहिलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.