Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : जयंतराव जुनाच डाव टाकणार; विरोधकांमधील वजीर हेरून ‘राजा’ला चेकमेट देण्याची खेळी

Islampur Assembly Constituency : मागील निवडणुकीत भाजपकडून निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या वेळी ते उमेदवार असणार की शिंदे सेनेचे आनंदराव पवार की गौरव नायकवडी असणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.

शांताराम पाटील .

Islampur, 13 September : विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात सध्या जोरजोरात वाजू लागले आहेत. सर्वच इच्छूक कामाला लागले आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधातील उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. महायुतीमध्ये ही जागा कोणाला सुटते, यावरच महायुतीचा उमेदवार कोण असणार, हे स्पष्ट होणार आहे.

मागील निवडणुकीत भाजपकडून निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या वेळी ते उमेदवार असणार की शिंदे सेनेचे आनंदराव पवार की गौरव नायकवडी असणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे, जयंतराव विरोधी हालचालींवर ट्रॅप लावून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची (NCP) जबाबदारी सांभाळत निश्चिंतपणे राज्यभर दौरे करत आहेत.

विरोधी उमेदवार कोण असावा, हेही जयंत पाटील हेच ठरवतात, असे मिश्किलपणे म्हटलं जातं. जयंत पाटील हे विरोधकांचा डाव आधीच ओळखून तशी पाऊले टाकतात आणि आपल्या विरोधातील उमेदवाराचीही तेच जुळणी करतात, हे मागील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) दिसून आले आहे.

निवडणुकीतील विजयानंतर दुसऱ्याच वर्षी जयंत पाटील हे पुढच्या निवडणुकीची तयारी करत असतात. विरोधकांमधील वजीर हेरून तो मैदानात कसे उतरेल आणि लढाईच्या तयारीत असलेल्या राजाला चेकमेट करत विरोधकांचा डाव त्यांच्यावरच उलटवतात. सध्याही तशीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे गेली पाच वर्षे निवडणुकीची तयारी करीत आहेत. संघटना वाढविण्यासाठी भाजपनेही त्यांना प्रोत्साहन दिले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी यांनी हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचा दावा करत विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत आणि राहुल महाडिक यांचे त्यांना उघडपणे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

महायुतीमध्ये इस्लामपूर मतदासंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. मात्र, राष्ट्रवादीने काहीशी मवाळ भूमिका घेत सर्वसहमतीने जो उमेदवार असेल, तो आम्हाला मान्य आहे, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदार पाटील यांनी सांगितले. त्यामुळे इस्लामपूरच्या उमेदवारीसाठी शिंदे गट आणि भाजपमध्येच स्पर्धा रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

भाजपचे निशिकांत पाटील यांची उमेदवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्षभरापूर्वी इस्लामपूरमधील एका कार्यक्रमात जाहीर केली होती. त्यानंतर मात्र आनंदराव पवार आणि हुतात्मा उद्योग समुहाचे गौरव नायकवडी हेही आमदारकीसाठी इच्छूक आहेत.

इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार दिला तर तगडी फाईट होऊ शकते, अन्यथा डिपॉझिट वाचविणेही अवघड होऊन जाते. त्यामुळे इस्लापूरमध्ये दुरंगी लढत होते की तिरंगी हे पाहावे लागेल.

जयंत पाटील यांनी आतापर्यंत सर्व मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली आहे. विरोधातील संभाव्य इच्छूक मात्र मदारसंघात कमी आणि मुंबईमध्ये जास्त काळ असतात, अशी परिस्थिती मतदारसंघात आहे, त्याचा जयंतरावांनाच अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT