अतिवृष्टी आणि महापुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना सोलापूरच्या उंदरगावात शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.
२०१४ च्या निवडणुकीत ज्यांनी त्यांना वर्गणी काढून मदत केली होती, त्याच गावकऱ्यांनी दखल न घेतल्याचा आरोप करून त्यांना कठोर शब्दांत प्रश्न विचारले.
प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बाजूला केल्याने ग्रामस्थ आणखी भडकले आणि खोतांना हात जोडून दौरा आटोपता घ्यावा लागला.
Solapur, 27 September : रयत शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत हे आज सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आले होते. माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पाहणी करत असताना आमदार खोत यांना शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. कारण, ज्या गावाने २०१४ च्या निवडणुकीत सदाभाऊंवर प्रचंड प्रेम केले, त्याच उंदरगावातून आज त्यांना दौरा उरकता घेऊन काढता पाय घ्यावा लागला. प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडून बाजूला नेले आणि शेतकऱ्यांच्या संतपाचा उद्रेक झाला. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना ग्रामस्थांपुढे हात जोडून दौरा आटोपता घ्यावा लागला.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे. पण सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीपिकांबरेाबरच जमीनही वाहून गेली आहे. तसेच पुराचे पाण्यामुळे घरातील सर्वकाही वाहून गेले आहे, त्यामुळे शेतकरी संकटात आहे. सर्वकाही पुराने वाहून नेल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक शब्दशः रस्त्यावर आले आहेत, त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश आहे.
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे रस्त्यावरूनच पाहणी करत होते. त्या वेळी शेतकऱ्यांनी आमचे नुकसान झालेल्या घराची पाहणी करा. केवळ फोटोसेशनला आलात का? तुम्ही परत जावा, असे सुनावले होते. त्याचवेळी प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ओढून बाजूला केले, तेव्हा उपस्थित शेतकरी आणि गावकऱ्यांच्या संतापाचा स्फोट झाला. गावकऱ्यांचा उद्रेक पाहून सदाभाऊ खोतांना काढता पाय घ्यावा लागला.
खरं तर लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या सदाभाऊ खोत यांना माढा मतदारसंघातील लोकांनी वर्गणी काढून मदत केली होती. स्वतःच्या खिशाला चाट लावून त्यांनी सदाभाऊंसाठी मदत केली होती. मात्र, सदाभाऊ त्यानंतर आजच गावात आले, तोही राग त्यांच्यावर निघाला. त्यातच प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बाजूला घेऊन गेल्यामुळे गावकरी संतापले.
पुराचे पाणी अचानक आल्याने शेतकऱ्यांना अंगावरील कपड्यानिशी घरातून बाहेर पडावे. नातेवाईक, पै पाहुण्यांकडे घरातील लोकांची सोय करण्यात आली. मात्र, हिरवा आणि वाळलेला चारा वाहून गेल्याने जनावरांना काय टाकायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यातून सरकारी पातळीवर चाऱ्याची सोय होत नाही. गावात सर्वत्र चिखल साठलेला आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजना करण्यााबाबत टोलवाटोलवी केली जात आहे.
आमच्या उसाला सदाभाऊ खोत यांनी भाव मिळवून दिलेला नाही. त्यांनी ऊसाला दर मिळवून दिला म्हटलं तर मी आत्मदहन करतो. दलबदलू माणूस आहे हा आणि तुम्ही काय आम्हाला सांगता शेतकरी संघटनेचं. शेतकरी संघटनेत होते, त्या वेळी आम्ही त्यांच्यासाठी जीवाचे रान केले आहे. तुमच्यासारख्या पुढाऱ्यांना त्यांनी सहकार्य केले, आम्हा शेतकऱ्यांना काय सहकार्य केले, असा सवालही एका ज्येष्ठ शेतकऱ्याने केला.
आम्ही काय मागायचंच नाही का. आमच्या गावातील पोरगं काय तर बोललं असेल. त्याला लगेच धरून नेत आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी काय बोलायचंच नाही का? म्हणजे आमचा आवाज दाबता तुम्ही. पाच हजार मदत असते का? सरकारला कमी पडलं असेल तर आमच्याकडून घ्या. तुम्ही किती खाता आम्ही विचारतो का? असा सवालही शेतकऱ्यांनी केला.
तुम्ही खासदारकीला उभे होते, तेव्हा आम्ही तुम्हाला वर्गणी काढून मदत केली आणि आज तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडून दलबदलूपणा करता. एक सांगतो नेपाळसारखं होईल एक दिवस, हेही लक्षात ठेवा. आम्ही आहे तोपर्यंत संयम पाळतो. तुम्ही जगा, आम्हाला जगवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
प्र: आमदार सदाभाऊ खोत कोणत्या कारणासाठी उंदरगावात आले होते?
उ: अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी.
प्र: गावकऱ्यांचा संताप का उसळला?
उ: निवडणुकीनंतर १० वर्षांनी गावाला भेट दिल्याचा आणि मदत न केल्याचा आरोप करून.
प्र: पोलिसांनी कोणती कृती केल्यामुळे गावकऱ्यांचा रोष वाढला?
उ: प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला पकडून बाजूला नेल्यामुळे.
प्र: शेतकऱ्यांनी कोणती मुख्य मागणी केली?
उ: पुरग्रस्तांसाठी तातडीची मदत आणि जनावरांसाठी चाऱ्याची सोय करण्याची.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.