Vijay Babar-Shahajibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil News : शहाजीबापूंचे पाय धुऊन पाणी पिण्याची भाजप पदाधिकाऱ्याची घोषणा; असं काय घडलं?

दत्तात्रय खंडागळे

Sangola News : सांगोला तालुक्याला टेंभू योजनेतून आमदार शहाजी पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे पावणेदोन टीएमसी पाणी मिळाले. तसेच, माण नदीला सुमारे सहाशे एमसीएफटी पाणी टेंभू योजनेतून देण्यासाठी पाठपुरावा करून यश मिळविले आहे. माण नदीत टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात येणार आहे. भाजपचे जिल्हा सचिव विजय बाबर यांनी नदीत पाणी सोडण्याचा जल्लोष अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांचे पाय धुऊन पाणी पिण्याची घोषणा भाजप पदाधिकारी विजय बाबर यांनी केली आहे. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. (Will wash MLA Shahaji Patil's feet and drink water : Vijay Babar)

माण नदीला कायमस्वरूपी पाणी मिळावे; म्हणून आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. सुमारे 200 जनावरे घेऊन तब्बल 27 दिवस सांगोला तहसील कार्यालयासमोर बसलो होतो. पुण्यातील सिंचन भवन येथे जाऊन आंदोलन केले. सांगलीतील गुनाले यांच्या कार्यालयाबाहेर 22 दिवस आंदोलन केले. माणमध्ये पाणी सोडावे, म्हणून डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबत अनेकदा काम केले. सांगोला तालुक्यातील पाण्याचे मोजमाप या चार वर्षांच्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले, असे भाजपचे जिल्हा सचिव विजय बाबर यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माण नदीला सांगोला तालुक्यात कायमस्वरूपी पाणी मिळणं, मोठं जिकीरीचं काम होतं. कायमस्वरूपी माण नदीला पाणी मिळवायचे असेल तर दुसऱ्या धरणाची निर्मिती करावी लागेल किंवा कोयना धरणाची उंची वाढवावी लागेल, यातून अनेक आंदोलने पुढे येतील, त्यामुळे या नदीला पाणी मिळेल, असं मला या जन्मात तरी वाटत नव्हतं, अशी कबुली बाबर यांनी दिली.

विजय बाबर म्हणाले की, टेंभू योजनेसाठी कोयना धरणावरील वीजनिर्मिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार शहाजी पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कमी केली. लवादाने पाणीवाटप केल्यानंतर पाणीवाटप कोणाच्या हातात राहत नाही. पण, सततच्या पाठपुराव्यातून मार्ग निघाला आणि टेंभू सिंचन योजनेसाठी आठ टीएमसी पाणी मिळाले.

शहाजी पाटील यांनी त्या आठ टीएमसी पाण्यातून पावणेदोन टीएमसी पाणी सांगोला तालुक्यासाठी मिळविले. सांगोला तालुक्यातील दहा पिढ्या हे उपकार विसरणार नाही. पाण्याचे हे फार मोठे काम आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे. त्यांचे मी कुटुंबासह पाय धुऊन पाणी पिणार आहे, अशी घोषणा भाजपचे जिल्हा सचिव विजय बाबर यांनी केली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT