Solapur, 11 August : लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटिल यांना निवडून देत 48 पैकी 31जागा निवडून दिल्या आहेत, त्यामुळे तुमच्या मागण्या देशाच्या पार्लमेंटमध्ये मांडणे, हे आमचं नैतिक कर्तव्य आहे,
अशा शब्दांत भटक्या विमुक्त जातींच्या प्रश्नांना संसदेत वाचा फोडण्याचे काम केले जाईल, असा शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भटक्या विमुक्तांच्या मेळाव्यात दिला.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (sushilkumar Shinde) आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये आज भटक्या विमुक्त जाती समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर भाष्य केले.
शरद पवार म्हणाले, सेटलमेंट हे सोलापूर, बारामती आणि अंबरनाथला होतं. यामध्ये भटक्या विमुक्त जातींना तारीच्या कुंपणात डांबून ठेवलं जातं होतं. याबाबत सुटकेचा आदेश देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी दिला होता. त्या भटक्या आणि विमुक्त जातींचा मेळावा आज आपण घेत आहोत
सुशीलकुमार शिंदे आणि मी मंत्री म्हणून काम करत असताना सत्तेच्या आणि अधिकाराच्या जागेवर भटक्या विमुक्तांना स्थान देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. भटक्या विमुक्तांची जनगणना करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहेत. त्यांची संख्या कळल्यानंतर सरकारने त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद कशा पद्धतीने केली पाहिजे, यासाठी मदत होईल, असेही पवार यांनी नमूद केले.
भटक्या विमुक्त जाती या समाजाच्या उन्नतीसाठी बजेट मांडलं पाहिजे. दलित वस्ती रमाई योजनेप्रमाणे भटके विमुक्तांसाठी घरकुल योजना राबविली पाहिजे. केंद्र सरकारने भटक्या विमुक्तांसाठी किती टक्के घरांची तरतूद केली आहे, असा सवालही शरद पवार यांनी विचारला.
ते म्हणाले, भटक्या विमुक्त जातीमधील वडार समाज हा अत्यंत महत्वाचा समाज आहे. घाम गाळून जगणाऱ्या वडार लोकांना रॉयल्टीपासून माफी द्यावी. भटक्या विमुक्तांसाठी आश्रम शाळाच्या संख्या वाढवल्या पाहिजेत.
आगामी थोड्याच दिवसांत निवडणुकीचा काळ येईल, त्यावेळी सत्ताधाऱ्यांपुढे आपल्या मागण्यांबद्दलचा कार्यक्रम मांडावा लागेल. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या कार्यक्रमात या सर्व गोष्टींचा उल्लेख निश्चितपणे करण्यात येईल, असेही पवारांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.