Self-immolation Attempt-Solapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : एका हातात पेटता टेंभा अन्‌ दुसऱ्या हातात पेट्रोलचे कॅन...पालकमंत्र्यांसमोरच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Vijaykumar Dudhale

Solapur News : टाकळी टेंभुर्णी (ता. माढा) येथील व्यायाम शाळेतील भ्रष्टाचाराची तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने दादा कळसाईत या तरूणाने आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एका हातात पेटवलेला टेंभा आणि दुसऱ्या हातात पेट्रोलचे कॅन होते. तो कॅनमधील पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेण्याची धमकी देत होता. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले आणि पुढील अनर्थ टळला. (Youth attempted self-immolation in Solapur in front of Guardian Minister Chandrakant Patil)

दादा कळसाईत यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्याला पुन्हा गालबोट लागले आहे. यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला होता, तर चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याचा दौऱ्यात त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांचा सोलापुरातील दौरा पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते बैठकीसाठी नियोजन भवन येथे आले होते. नियोजन समितीची बैठक संपवून पाटील यांचा ताफा ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनासाठी निघाला होता. त्यावेळी काही अंतरावरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर कळसाईत हा पालकमंत्र्यांच्या ताफ्याला आडवा गेला.

टाकळी टेंभुर्णी येथील व्यायाम शाळेतील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. भ्रष्टाचारसंदर्भात तक्रार दाखल करूनही प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही, असे सांगून कळसाईत हे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत होते.

व्यायाम शाळेतील गैरव्यवहारात काही वरिष्ठ अधिकारी सामील असल्याची चर्चा गावात आहे, असे कळसाईत यांचे म्हणणे होते. ‘साहेब मला न्याय द्या, जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढलाय, तुम्हाला त्रास नको, तुम्ही मागे व्हा, असे म्हणून तो पेटवून घेण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा पुढे जाताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पडले आणि पोलिस ठाण्यात नेले.

Edited By-Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT