Shivsena UBT : चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर घरात घुसून चाकूहल्ला झाल्याने पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला जातो, त्याच मुंबईत एका हायप्रोफाईल व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर या दाव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एका मुंबई सर्वात सुरक्षित असल्याचा दावा करतांना एखादी घटना घडत असते, असे विधान केले.
यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे. मुंबई सर्वात सुरक्षित शहर असून काही वेळा एखादी घटना घडते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र या राज्यातील राज्यकर्त्यांची नैतिकता संपली आहे, याचे द्योतक म्हणजे हे असंवेदनशील वक्तव्य आहे. असे असेल तर मग या राज्यात सुरक्षित आहे तरी कोण? असा सवाल दानवे यांनी उपस्थितीत केला.
सैफ अली खान सुरक्षित नाही, पुण्यातील ऑफिसात जाणारी आमची बहीण सुरक्षित नाही,सरपंच संतोष देशमुख सुरक्षित नाही, परभणीचा लॉ चा विद्यार्थी असलेला सोमनाथ सूर्यवंशी सुरक्षित नाही. (Devendra Fadanvis) खुलेआम एका नेत्याची (बाबा सिद्दीकींची) पोलीस संरक्षण असताना गोळ्या घालून हत्या होते तर सलमान खानच्या घरावर गोळीबार होतो. वाल्मीक कराड सारखा गुन्हेगार सुरक्षा व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून मोठ्या थाटात सीआयडी ऑफिसात स्वतःच्या गाडीने हजार होतो.
ललित पाटील रुग्णालयातून अमली पदार्थांचा व्यवसाय करतो. पोलीस चौकीत गोळीबार करण्याची हिंमत दाखवली जाते. सर्वसामान्यांवर कोयत्याने हल्ले होतात तर कधी पोलिसांवर वार करण्याची हिंमत होते. साधा एफआयआर नोंदवण्यापासून संघर्ष करावा लागतो. या राज्याला सुसंस्कृत आणि जबाबदार नेत्यांचा इतिहास आहे. बोलण्यात चूक झाली म्हणून राजीनामा देणारे आर.आर पाटील आबा आपल्या विस्मरणात गेलेत.
एका दिग्दर्शकाला दहशतवादी हल्ल्यानंतर सोबत घेऊन गेल्यामुळे राजीनामा देणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख किंवा ड्रेस चेंज करुन असंवेदनशीलता दाखवली म्हणून केंद्रीय गृह खात्याचा राजीनामा देणारे शिवराज पाटील देखील आज देवेंद्र फडणवीस आपल्याला आठवत नाहीत का? असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
फडणवीससाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकतेचा मुद्दा वेशीवर टांगला गेलाय मात्र 'एखादी घटना घडत असते' असं असंवेदनशील वक्तव्य करून जबाबदारी ढकलू नका. हुशार, अभ्यासू आणि विकासपुरुष म्हणवून घेणाऱ्या नेत्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेची यापेक्षा अधिक अपेक्षा नाही, अशा शब्दात दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.