Shirdi News : महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही.
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असली तरी तुर्तास चंद्रशेखर बावनकुळे हेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. रवींद्र चव्हाण यांची पुढील काळात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांने दिली आहे.
भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्राद्वारे शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. दरम्यान, रवींद्र चव्हाण यांना आताच महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्ष केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी त्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळणार आहे.
पक्षात समतोल साधण्याचा प्रयत्न
चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. बावनकुळे यांना मंत्रिमंडळात चांगलं महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर आता चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन संतुलन साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोकणात भाजपला मोठे यश मिळवून देण्यात चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
रवींद्र चव्हाण यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पहिला तर कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगसेवक ते भाजप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष असा आहे. रवींद्र चव्हाण 2005 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2007 साली त्यांची महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर 2009 साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्या विधानसभेत पोहोचले.
2014, 2019, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. 2016 साली त्यांना राज्यमंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचे राज्यमंत्रिपदे भूषवली. त्यानंतर शिंदे सरकारच्या काळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.