Devendra Fadnavis : राणें-खाडेंची विधाने ठरणार का फडणवीसांच्या वाटेतले काटे?

BJP Maharashtra internal conflicts 2025 :दिल्लीला मात देत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस या टर्ममध्ये वेगळे दिसत आहे, सर्वमावेशक राजकारण करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. मंत्रिपदावर असलेले नितेश राणे यांच्यासह सुरेश खाडे यांना फडणवीस यांची ही वाटचाल पाहवत नसेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राणे, खाडे यांच्या ताज्या विधानांमुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Suresh Khade, Devendra Fadnavis, Nitesh Rane
Suresh Khade, Devendra Fadnavis, Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

विरोधी पक्षांमध्ये जसे राजकारण असते तसेच राजकारण, राजकीय कुरघोड्या पंक्षांतर्गतही सुरू असतात. पक्ष जितका मोठा, शक्तिशाली तितके याचे प्रमाण अधिक असते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार, हे ठरवण्यासाठी जवळपास 10 ते 12 दिवस लागले होते. यादरम्यान अनेक नावे समोर आली होती. अखेर अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची वाढलेली उंची त्यांच्याच काही सहकाऱ्यांना पाहवत नाही काय, असे चित्र दिसत आहे.

गेल्या दोन दिवसांत, म्हणजे 9 आणि 10 जानेवारीला झालेले कार्यक्रम, भाजपच्या नेत्यांनी केलेल्या विधानांची यादी करून तिचे निरीक्षण केल्यास मुख्यमंत्री फडणवीस यांची वाढत असलेली उंची त्यांच्या पक्षातील काही उथळ नेत्यांना खरेच पाहवत नाही का, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची फडणवीस यांची वाट बिकट झाली होती. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीतून पुरेपूर प्रयत्न झाले, मात्र पक्ष, संघटनेवरील एकहाती पकड आणि आमदारांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी दिल्लीला मात देत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळवले.

पुण्यात 9 जानेवारी रोजी सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्याच्या पुढील पाच वर्षांच्या 'व्हिजन'ची प्रभावी मांडणी केली. आधीच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली, समृद्धी माहामार्गासारखे प्रकल्प राज्याच्या विकासात मैलाचे दगड ठरले आहेत. अशा अनेक प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली. सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांत काय करणार, याचे नियोजन अधिकाऱ्यांकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले. विविध विभागांना त्यांनी 100 दिवसांचे 'टार्गेट' ठरवून दिले आहे. मुदतीनंतर त्याचा आढावा घेतला जाणार आहे.

आता त्याच्या दुसऱ्या दिवशी काय झाले पाहा. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती समारोहाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली. कन्नमवार हे अर्थातच काँग्रेसचे. या समारंभात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहतो, असे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. राजकारणाच्या वेळी राजकारण, अन्य वेळी पक्षाच्या पलीकडे जाऊन संबंध जोपासायचे असतात, याचा वस्तुपाठ फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घालून दिला.

Suresh Khade, Devendra Fadnavis, Nitesh Rane
Delhi Election 2025 : केजरीवालांना घेरण्यासाठी भाजपने आखली रणनीती ; उचलणार 'हे' पाऊल

हे सर्व सुरू असताना तिकडे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) सज्जच होते. राहुल गांधी, प्रियंका गांधी निवडून येतात म्हणून केरळला त्यांनी पाकिस्तानची उपमा काही दिवसांपूर्वीच दिली होती. उथळ, द्वेषमूलक विधाने करणे, अशी नितेश राणे यांची ओळख निर्माण झाली आहे. कोणत्याही माजी मुख्यमंत्र्यांची अशी मुले पाहिली नाहीत, असे विधान शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी नाव न घेता नारायण राणे यांना उद्देशून केले होते. आपली ही ओळख पुसली जाणार नाही, याची दक्षता नितेश राणे काटोकोरपणे घेतात आणि एका विशिष्ट धर्माच्या विरोधात आग ओकत असतात. मंत्री राणे यांनी 'ईव्हीएम'चा संदर्भ देत या विशिष्ट समाजावर पुन्हा एकदा उथळ टीका करत आपल्या खुज्या मानसिकतेचे प्रदर्शन घडवले.

माजी मंत्री सुरेश खाडे यांची मंत्री राणे यांना साथ मिळाली. खाडे यांनीही मिरजबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केले. मुख्यमंत्री फडणवीस यांची उंची वाढत आहे, हे भाजपमधल्याच त्यांच्या सहकाऱ्यांना रुचत नाही, असे यावरून स्पष्ट दिसत आहे. यासाठी घटनाक्रम समजून घ्यावा लागे. फडणवीस यांनी त्यांचे व्हिजन प्रभावीपणे मांडले होते. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्याबाबत मोठे विधान केले होते. उद्धव ठाकरे भाजपसोबत येणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

या सर्व घडामोडींत मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा उजळून निघत होती. नितेश राणे आणि सुरेश खाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नवीच चर्चा सुरू झाली आणि फडणवीस यांच्याबाबतची सकारात्मक चर्चा मागे पडली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण, बॅ. ए. आर. अंतुले, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे अशा लोकनेत्यांची महाराष्ट्राला परंपरा आहे. या लोकनेत्यांच्या यादीत जाऊन बसायचे असेल तर काय करायला पाहिजे, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे.

सूडभावनाने वागणार नाही, हे फडणवीस यांचे विधान असो की, कन्नमवार यांच्या जयंती सोहळ्याला त्यांची उपस्थिती असो, की महाराष्ट्राच्या पुढील पाच वर्षांच्या व्हिजनची त्यांची मांडणी असो... मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कोणत्याही समुदायाच्या विरोधात द्वेषमूलक राजकारण करून यश मिळवता येईल, सत्ता मिळवता येईल, मात्र लोकनेत्यांच्या यादीत स्थान मिळणार नाही, हे त्यांच्या या निवडणुकीनंतर लक्षात आले असावे. अत्यंत उथळ, अत्यंत सामान्य वकूब असलेल्या सहकाऱ्यांना फडणवीस यांच्यातील बदल आणि त्यांचे 'व्हिजन' मान्य नसल्याचे दिसत आहे.

Suresh Khade, Devendra Fadnavis, Nitesh Rane
Maharashtra Politic's : महाआघाडीला मोठा धक्का; महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे सेनेची घोषणा

दोन समाजांमध्ये द्वेषाचा वणवा पेटवला की आपली राजकीय पोळी भाजली जाते, हे नितेश राणे आणि सुरेश खाडे यांच्या लक्षात आले असेल. वणवा पेटला की तो समोर कोण आहे, हे पाहत नाही, हेही त्यांनी लक्षात घ्यावे. राज्यातील सामाजिक वातावरण आधीच गढूळ झालेले आहे. राणे, खाडे यांच्या वक्तव्यांनी त्यात भर पडू शकते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरील आव्हानांत वाढ होऊ शकते, त्यांचे विकासाचे व्हिजन बाजूला पडून नको त्या कामांत त्यांना गुंतून पडावे लागू शकते. प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांमुळे फडणवीस यांच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात.

मंत्र्याने केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याची एखाद्या न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली किंवा कुणीतरी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले तर काय होईल? मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या अडचणी वाढतील, नितेश राणे, सुरेश खाडे यांना हेच हवे आहे का? फडणवीस यांची वाढत असलेली उंची दिल्लीसाठी चिंताजनक ठरणार आहे, तशी ती राज्यातील काही नेत्यांसाठीही चिंताजनक ठरू शकते. त्यामुळे नितेश राणे आणि सुरेश खाडे हे उथळ विधाने करत असतील का, असा प्रश्न पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com