Sangli News : जिल्हा परिषद अध्यक्षांचा ‘वसंत’ बंगला आज जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान बनला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भाजप, शिवसेना साऱ्या पक्षांचे झाडून नेते बंगल्यावर हजर होते. या चर्चेच्या मुख्य आसनावर विराजमान होते आमदार जयंत पाटील. त्यांच्याशी ऑनलाइन चर्चा करत होते, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना व राष्ट्रवादीचे अनेक नेते. एकेक गुंता सुटत चालला होता आणि पंधरा जागा बिनविरोध झाल्यानंतरही चर्चेचे गुऱ्हाळ थांबत नव्हते. जयंतराव जुन्या भिडूंना हाताळत होते. अखेर सहा जागांवर लढत निश्चित झाली. बहुतांश नेत्यांचे सगेसोयरे बँकेत प्रवेशकर्ते झाले, तर अनेकांना या तडजोडीत माघार घ्यावी लागली. त्यात जयंतरावांचे मेहुणे आणि मेहुणी या दोघांचाही समावेश होतो.
महाविकास आघाडीकडून आमदार जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, बॅंकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक चर्चेत सहभागी होते. भाजपकडून पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यात बैठकांचे सत्र सुरू होते. राष्ट्रवादी (अजित पवार) चे नेते शिवाजीराव नाईक, शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, तानाजी पाटील हे आपली बाजू रेटत होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सात, काँग्रेस पाच, भाजप पाच, शिवसेना एकनाथ शिंदे तीन व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एक असे जागा वाटप निश्चित झाले. यानंतर नेत्यांची खरी कसरत सुरू झाली. कोणाला कोणत्या गटात उमेदवारी द्यायची, यावरून चर्चेच्या फैऱ्या झडत होत्या. अनेकांची दांडी उडाली.
भाजपमध्ये (BJP) मोठी रस्सीखेच होती. थेट मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील शिफारशी केल्या. तासातासाला उमेदवार बदलत होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपत आली, तशी यादी निश्चित होत गेली. जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज सोसायटी गटाचा तिढा कायम राहिला. अनुसूचित जाती व भटक्या जमाती या गटात वेळेत अर्ज माघारी न झाल्याने निवडणूक लागली.
सदाभाऊंचे टीकास्त्र
आमदार सदाभाऊ खोत यांनी सग्यासोयऱ्यांनी लोण्याचा गोळा वाटून खाल्ला आहे, अशी खरमरीत टीका केली आहे. दुष्काळ पडल्याने बिनविरोध करत असल्याचे सांगितले खरे, मात्र नदीकाठचा भाग बिनविरोध करून दुष्काळी भागात निवडणूक लावली आहे.
संजयकाका-रोहित चर्चेतून मार्ग नाही
आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात दिवसभर तासगाव सोसायटी गट बिनविरोध व्हावा, यासाठी चर्चा सुरू होत्या. रोहित यांनी आई सुमनताईंसाठी काकांकडे शब्द टाकला, मात्र काकांनी ‘लढायचे आहे’, या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली. त्यातून काही पर्याय निघावा, यासाठी रोहित यांनी प्रयत्न केले, मात्र ते फसले आणि थेट लढत लागली.
घराणेशाही, भाऊबंदकीला प्राधान्य
जिल्हा बॅँकेच्या तिकीटवाटपात सर्वच पक्षात घराणेशाही व भाऊबंदकीला प्राधान्य देण्यात आले. आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचे बंधू देवराज पाटील, आमदार विश्वजित कदम स्वत: तसेच त्यांचे भावोजी महेंद्र लाड व मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांच्या पत्नी वर्षा सावंत, खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, आमदार सुहास बाबर यांचे बंधू अमोल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू सतीश देशमुख व चुलत बंधू संग्राम देशमुख यांच्या पत्नी अपर्णा देशमुख यांचा बिनविरोधमध्ये समावेश आहे.
13 विद्यमान रिंगणाबाहेर
अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्री पाटील, दिलीप पाटील, सत्यजित देशमुख, खासदार विशाल पाटील, सुरेश पाटील, चिमण डांगे, मन्सूर खतीब, प्रकाश जमदाडे, बी. एस. पाटील, संग्रामसिंह देशमुख, अनिता सगरे, बाळासाहेब होनमोरे.
मुख्यमंत्र्यांचे आदेश अन्...
बँकेचे विद्यमान संचालक संग्राम देशमुख यांच्या पत्नी अपर्णा यांची उमेदवारी आधी डावलण्यात आली होती. त्यांच्याएवेजी आमदार सत्यजित देशमुख यांच्या पत्नी रेणुका यांचे नाव निश्चित झाले होते. तशी यादीही माध्यमांना देण्यात आली, मात्र संग्राम देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना फोन करून अपर्णा देशमुख यांना उमेदवारी देण्याचे आदेश दिले. त्यामुळे देशमुखांच्या घरातील सतीश देशमुख व अपर्णा देशमुख हे दीर-भावजय आता जिल्हा बॅँकेत संचालक असणार आहेत.
हे विद्यमान पुन्हा दाखल...
पृथ्वीराज पाटील, वैभव शिंदे, राहुल महाडिक, महेंद्र लाड, अमोल बाबर, तानाजी पाटील, हे नवीन चेहरे येणार - आमदार विश्वजित कदम, देवराज पाटील, रणधीर नाईक, विराज नाईक, पूजा पाटील, अपर्णा देशमुख, सतीश देशमुख, वर्षा सावंत, नितीन होनराव.