Sanjay Raut Radhakrishna Vikhe Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut News : 'महानंद'बाबत विखेंच्या मेहुण्यांनी करून दाखवलं, संजय राऊतांचा टोला; केला 'हा' आरोप

Sanjay Raut On Modi Govt : "केंद्र सरकार मुंबईचे उद्योग, संस्था गुजरातकडे घेऊन चालले आहे," अशी टीकाही राऊतांनी केली आहे.

Pradeep Pendhare

राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंद डेअरीच्या ( Mahanand Dairy ) चेअरमनसह 17 संचालकांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारची ही संस्था गुजरातकडे जाणार असल्याचे बोललं जात आहे. यावरून राज्यातील विरोधक आक्रमक झालेत. शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर शेलक्या शब्दांत हल्ला चढवलाय. "विखेंच्या मेहुण्यांनी करून दाखवले असून, महानंद डेअरीची ५० एकर जमीन अदानींना विकण्याचा डाव आहे," असा गंभीर आरोप खासदार राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला.

"महाराष्ट्रातील एक-एक संस्था, उद्योग गुजरातकडे चालल्याचे पूर्वीच म्हटले होते. उद्या मुंबईदेखील गुजरातला देतील," असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"महानंदचे चेअरमन कोण होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सख्खे मेहुणे. मेहुणे, मेहुणे, सख्खे पाहुणे... अन् पाहुण्यांनी दिले महानंद! महानंद डेअरीमध्ये शेकडो कर्मचारी आहेत. काय केले या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी. यावर भूमिका व्यक्त केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारची एक डेअरी हे चालवू शकत नाहीत. स्वत:च्या डेअऱ्या बरोबर चालल्या आहेत. स्वतःच्या खोक्यांचे राजकारण बरोबर चालले आहे," असा टोला संजय राऊतांनी लगावला.

"ही निवडणुकीची गोष्ट नसून, फडणवीस, शिंदे, पवार यांचे सरकार असल्यापासून सर्वांच्या मनात भीती आहे. केंद्र सरकार मुंबईचे उद्योग, संस्था गुजरातकडे घेऊन चालले आहे. आज महानंद घेऊन गेले. धारावी विकली. मिठाची जमीन विकली. देवेंद्र फडणवीस हा मुंबईचा सौदा करत आहेत. परंतु, त्यांच्यात हिंमत नाही. महाराष्ट्राचा नेता असून ते हे रोखू शकत नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे लोक लाचार आहेत. ते मुंबईचा सौदा करत आहेत," असा आरोप राऊतांनी केला आहे.

"महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार आता गुजरातमधून चालणार आहे. राज्य सरकारची ही डेअरी हे चालवू शकत नाहीत. साखर सम्राटांच्या डेअरी सुरू आहेत. महानंदा ही डेअरी नुसती जात नसून, गोरेगावमधील ५० एकरची जमीन विकण्याचा डाव आहे. यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार हेदेखील सहभागी आहेत. ही जमीन अदानींना विकली जाणार आहे," असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT