Sanjay Shirsat News Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Shirsat News : शिरसाट साहेब जरा सबुरीने घ्या! शिवसेना एकत्रि‍करणाच्या विधानाने मनं दुभंगली!

Sanjay Shirsat's statement regarding the unification of Shiv Sena has created tensions within the Mahayuti alliance. Read more on the political implications of this move. : जबाबदार मंत्री म्हणून काही गोष्टी संजय शिरसाट यांना अत्यंत काळजीपूर्वक हाताळाव्या लागतील हेच, त्याच्या शिवसेना एकत्रि‍करणाच्या विधानानंतर उठलेल्या मोहळावरून स्पष्ट होते.

Jagdish Pansare

Shivsena News : राज्याचे सामाजिक न्याय व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत. 'शिवसेनेत फूट पडल्यामुळे मनाला वेदना झाल्या, दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करू' असे धाडसी आणि त्यांच्या अधिकारात नसलेले विधान त्यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. त्याचा व्हायचा तो उलट परिणाम झाला आणि शिवसेना एकत्रि‍करणाच्या या विधानाने युतीतील मने दुंभगण्याची वेळ आली.

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये मनासारखे काहीच घडत नसल्याने नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोकेदुखीत शिरसाट यांच्या या विधानाने भर टाकली. मग त्यांना भाजपच्या नेत्यांची समजूत काढावी लागली अन् संजय शिरसाट यांनाही कानपिचक्या द्याव्या लागल्या. या सगळ्या घडामोडी, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता मंत्री संजय शिरसाट यांना 'जरा सबुरीने घ्या'असे सांगण्याची वेळ आली आहे.

अडीच वर्षापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामध्ये संजय शिरसाट यांची महत्वाची भूमिका होती. चाळीसहून अधिक आमदार जेव्हा गुवहाटीमध्ये होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून थेट अंगावर घेणारे आणि जाहीरपणे टीका करणारे संजय शिरसाट हेच होते. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सावली सारखे वावरले. शिवसेनेच्या विशेषतः छत्रपती संभाजीनगरमधील वाटचालीत आणि पक्ष बांधणीत संजय शिरसाट यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. एक रिक्षाचालक ते कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री हा त्यांचा प्रवास सोपा नाही.

संयमाचा धडा शिरसाट विसरले?

परभणीमध्ये शिवसेनेच्या नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात संजय शिरसाट यांनी शिवसैनिकांना राजकारणात संयम किती महत्वाचा असतो याचे धडे दिले. सयंम बाळगल्यामुळेच आपण मंत्री आणि पालकमंत्री झालो, असे शिरसाट यांनी सांगितले. पण मंत्री पदावर असलेल्या नेत्यांनी राजकारणात विधान करतांनाही संयम बाळगला पाहिजे, हे आता त्यांच्या लक्षात आले असेल. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर राज्यात अस्तित्वात आलेले शिवसेना-भाजप युतीचे सरकार हा साधा विषय नाही.

हे सत्तांतर घडवून आणण्यासाठी भाजपला किती प्रयत्न करावे लागले, हे त्यांनाच माहित. त्यामुळे या सरकारचा भाग आणि त्यातील जबाबदार मंत्री म्हणून काही गोष्टी संजय शिरसाट यांना अत्यंत काळजीपूर्वक हाताळाव्या लागतील हेच, त्याच्या शिवसेना एकत्रि‍करणाच्या विधानानंतर उठलेल्या मोहळावरून स्पष्ट होते. एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांच्यावर राज्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी पक्षाची बाजू मजबुतीने मांडली,यात शंका नाही. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात ऐनवेळी संधी हुकली तरी शिरसाट नाराज झाले नाही, त्यांनी संयम राखला आणि शिंदेंना भक्कम साथ दिली. त्याचाच परिणाम म्हणून शिरसाट यांना महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अन् जिल्ह्याचे पालकत्व सोपवण्यात आले.

उद्धवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना सडेतोड उत्तरे देत शिरसाट यांनी राज्य पातळीवर आपला ठसा उमटवला याबद्दलही दुमत असण्याचे कारण नाही.परंतु मंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांच्या सुसाट सुटलेल्या गाडीला थोडा ब्रेक लावण्याची गरज असल्याचे त्यांना परवाच्या विधानवरून दिसून येते. मंत्री झाल्यानंतर दिलेल्या आपल्या पहिल्याच मुलाखतीत शिवसेना एकत्रि‍करण सारख्या 'ज्वलनशील'विषयाला त्यांनी हात घालायला नको होता. भाजपसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर पक्षांना या निमित्ताने आयते कोलितच मिळाले.

शिरसाट यांच्या या विषयाने महायुतीत वादाची थिणगी पडलीच आहे, आता तिचा वणवा होऊ नये एवढेच. भाजपचे नेते आक्रमक झाल्यानंतर शिरसाट यांनी घुमजाव केले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तिकडे मुंबईत एकनाथ शिंदे यांना माध्यमांना स्पष्टीकरण देतांना घाम फुटत होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलत अनेक प्रश्न उपस्थित करत शिंदे, शिरसाट यांची कोंडी केली. शिवाय भाजप नेत्यांच्या मनात यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना द्यायची ती समज योग्य शब्दात दिली आहे. यापुढे शिरसाट अधिक काळजी घेतील ही अपेक्षा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT