धडगाव (जि, नंदूरबार): लग्नाची लगबग, ढोल-ताशांचा गजर आणि आनंदाचं वातावरण... पण या सगळ्यात अचानक पोलिसांची एन्ट्री झाली आणि क्षणार्धात सगळं चित्र बदललं. कारणही तसंच गंभीर होतं — बालविवाह!
माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता थेट लग्नस्थळी धडक दिली. चौकशीदरम्यान वधू-वऱ्याचं वय कायदेशीर मर्यादेपेक्षा कमी असल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत हा बालविवाह रोखला.
या कारवाईमुळे एक अल्पवयीन मुलीचं आयुष्य चुकीच्या वळणावर जाण्यापासून वाचलं. तसेच संबंधित पालक आणि आयोजकांना कायद्याची जाणीव करून देत समज देण्यात आली.
धडगाव तालुक्यातील खर्डा येथील पाटील पाड्यात कायद्याचे उल्लंघन करून लावला जाणारा एक बालविवाह धडगाव पोलिसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला आहे. लग्नविधी सुरू असतानाच पोलिसांनी मंडपात धडक दिल्याने वऱ्हाडी मंडळींची मोठी पळापळ झाली.
या प्रकरणी अल्पवयीन मुला-मुलीचे आई-वडील आणि संबंधित नातेवाईकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे.
खर्डा गावच्या पाटील पाड्यात सुनील टेडग्या पाडवी यांच्या घरासमोर लग्नाची धामधूम सुरू होती. या विवाहासाठी वधू आणि वर दोघेही अल्पवयीन होते. विशेष म्हणजे, या मुलांचा विवाहास विरोध असतानाही त्यांचे पालक सुनील टेडग्या पाडवी आणि इंद्राबाई टेडग्या पाडवी (रा. खर्डा) हे जबरदस्तीने हा विवाह लावून देत होते. ही बाब गोपनीय माहितीद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचली.
या बालविवाहाची माहिती मिळताच धडगाव पोलीस ठाण्याचे अमंलदार डेव्हिड पाडवी व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लग्नाचे विधी सुरू असतानाच पोलीस पथक मंडपात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत विवाह थांबवला आणि दोन्ही मुलांच्या वयाची खात्री केली. ते अल्पवयीन असल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले.
या प्रकरणी फिर्यादी नाना काल्या वळवी (वय ४९, रा. पाडवी) यांच्या तक्रारीवरून धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम १० प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर १४८/२०२६ नुसार नोंद करण्यात आला आहे.
धडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक राजेंद्र जगताप , उपनिरीक्षक अनिल भुसारे ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डेव्हिड पाडवी,सुनीता पारचुरे ,नाना वळवी ग्रामपंचायत अधिकृत यांनी ही धाडसी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय माळी करत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात बालविवाहाच्या प्रथांविरुद्ध प्रशासन कडक पावले उचलत असतानाच ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुले अल्पवयीन आहेत हे माहित असूनही त्यांचा विवाह लावणे हा गंभीर गुन्हा आहे,असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सामाजिक स्तरावरून कौतुक होत आहे.
मुलांचे विहित कायदेशीर वय मुलगी १८ आणि मुलगा २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न लावू नका. बालविवाह केल्यास केवळ पालकांवरच नाही, तर त्या विवाहात सहभागी होणारे भटजी, वऱ्हाडी आणि मंडपवाले यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. समाजात कुठेही असे प्रकार घडत असल्याचे आढळल्यास तातडीने पोलिसांशी किंवा चाइल्ड हेल्पलाईन.शी संपर्क साधावा.
राजेंद्र जगताप (पोलिस निरीक्षक धडगाव पोलीस ठाणे)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.