Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून होणारे आऊटगोइंग थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बालेकिल्यातच मोठा धक्का बसला आहे. येथील बड्या नेत्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचा माहोल संपून वातावरण सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा ठाकरे सेनेला भाजपने (BJP) धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाची गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता डोंबिवलीत अनेक नेत्यांनी कमळ हाती घेतले आहे. उबाठाचे डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेचे डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपचे नगरसेवक दिपेश म्हात्रे उपस्थित होते. या प्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरण येत्या काळात बदलणार आहे.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मनमानी आणि कार्यकर्त्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे प्रकाश तेलगोटे यांनी शिवसेना सोडली आहे. कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये प्रवेश करताना तेलगोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. यामुळे भाजपची ताकद डोंबिवलीत आणखी वाढणार असल्याचे मानले जात आहे.
नगरसेवकाची केली होती हकालपट्टी
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे हे निवडून आल्यापासूनच शिवसेना शिंदे गट यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही मधुर म्हात्रे यांनी पक्षाच्या नाव नोंदणीसह गटाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थिती लावली नाही. यानंतर पक्षाने कारवाई करत मधुर म्हात्रे यांची हकालपट्टी केली. त्यानंतर मधुर म्हात्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.