Mumbai News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून 6 खासदार फुटल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या खासदारांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू असलेलं ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे या फुटलेल्या खासदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत.
उद्धव ठाकरेंना 6 खासदारांनी 'जय महाराष्ट्र' केल्याची चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून पक्षाच्या संसदीय दलाची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप देखील जारी करण्यात आला होता. मात्र, ६ खासदार या बैठकीला गैरहजर राहिले. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी या बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून बंडखोर खासदारांना शनिवारी(ता.20) कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला येत्या सात दिवसांत उत्तर देणे बंधनकारक असणार आहे. जर दिलेल्या मुदतीत बंडखोर खासदारांनी जर उत्तर दिले नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याच्या उद्देशानं पावलं उचलण्यात येईल असंही म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बंडखोर खासदारांमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. त्यात निंबाळकरांचा शिंदेच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाविषयीचा निर्णय अजून झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडानंतर पुन्हा एकदा पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं पुढं आलं आहे. त्यांनी वर्धापनाच्या कार्यक्रमातील आपल्या भाषणातही सामान्य लोकांपर्यत पोहोचवून शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याविषयीचे संकेत दिले होते.
चार वर्षांनंतर दुसऱ्यांदा पक्ष फुटल्यामुळे संतापलेले उद्धव ठाकरे हे आता बंडखोर खासदारांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात धडकणार आहे. ठाकरे लवकरच ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशीम आणि शिर्डी या सहा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात ईशान्य मुंबई मतदारसंघापासून होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव ठाकरे लवकरच बंडखोरांवर कारवाई होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.त्याआधी ठाकरे बंडखोरांविरोधात त्यांच्याच मतदारसंघात जाऊन खासदारांविरोधात वातावरण तापवणार आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरा करण्याचा निर्णय त्यांनी स्वत: घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.