Ahmednagar News : दुधाची खरेदी हमीभावानुसार होण्यासाठी अकोले येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण आंदोलन नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी लेखी पत्र दिल्यानंतर स्थगित करण्यात आले. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालयात बैठक घेऊन दूध दरवाढीवर तोडगा काढला जाईल, असे हे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. परंतु बैठक न झाल्यास पुन्हा तंबू ठोकून आंदोलन सुरू करू, असा इशारा जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे, अंकुश शेटे आणि अजित नवले यांनी दिला आहे.
राज्यात दूध खरेदी 26 ते 27 रुपयांनी सुरू आहे. राज्य सरकारने (State Government) हमीभाव 34 ते 35 रुपये जाहीर केला आहे. तरी सहा रुपये तफावतीने दूध खरेदी केली जात आहे. यामुळे दूध उत्पादकांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे.
अकोले येथे जनसंघर्ष संघटनेने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन तब्बल सहा दिवस सुरू राहिले. राज्याचे महसूल तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. परंतु तोडगा निघाला नाही. यानंतर आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
जनसंघर्ष संघटनेने सुरू असलेल्या आंदोलनाला आजी-माजी आमदार, खासदारांनी भेट घेत पाठिंबा दिला. शरद पवार(Sharad Pawar) यांनी आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तोडगा काढण्याची मागणी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान,बुधवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आंदोलनकर्ते यांची अकोले तहसील कार्यालयात भेट घेत, दूध दरवाढीवर मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. हिवाळी अधिवेशनापूर्वी आंदोलकांशी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली. निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू केले जाईल, अशा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.
डॉ. अजित नवले म्हणाले, "हे आंदोलन शेतकरी हितासाठी असल्याने यात आम्ही सहभागी झालो. हिवाळी अधिवेशनापूर्वी होत असलेल्या बैठकीस जायचे किंवा नाही हे किसान सभेच्या नेत्याशी बोलून निर्णय घेवू. दूध दर वाढीसाठी दूध पावडरची निर्यात करणे आणि राज्य सरकारने पाच रुपये लिटर मागे अनुदान देणे हाच पर्याय सर्व तज्ज्ञांनी सांगितला आहे. यासाठी कोणत्याही बैठकीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण बैठकीतून काहीही साध्य होत नाही, हा अनुभव आहे".(Milk Rate Protest)
दुधाची गुणवत्ता ठरवण्यासाठी स्निग्धांश आणि पोषकतत्वे यांच्या निकषांचे प्रमाण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे भेसळीचे प्रमाण कमी होऊन दूध उत्पादकांना त्याचा दर वाढीसाठी फायदा होईल. स्निग्धांश (फॅट) आणि त्यातील पोषक तत्वे (सॉलिड नाॅट फॅट-एसएनएफ) यांचे प्रमाण 3.5/8.5 असे होते. ते आता प्रमाण 3.2/ 8.3 इतके करण्यात आले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.