Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा यापूर्वी महायुतीत शिवसेनेच्या ताब्यात होत्या.पण आता शिवसेनेचा शिंदे गट युतीत असल्याने दोनपैकी एक जागा भाजपला द्यावी लागणार आहे.
आगामी लोकसभेसाठी जिल्ह्यातील दोन जागांपैकी एक जागा भारतीय जनता पक्षाने चिन्हावर लढवावी,असा सूर पक्ष कार्यकर्त्यांचा आहे.त्यातून एक जागा भाजपला तर एक जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला देण्याचा प्राथमिक फॉर्म्युला महायुतीत निश्चित झाल्याची माहिती आहे.
कोल्हापूर व हातकणंगलेपैकी भाजपला जागा कोणती द्यायची, हा निर्णय त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे. राज्यातील ४८ पैकी २६ मतदारसंघ भाजपच्या वाट्याला तर उर्वरित २२ जागा या शिंदे व अजित पवार गटाला विभागून देण्याचा प्राथमिक फॉर्म्युला तयार झाला आहे.२०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी २३ जागा त्यांनी जिंकल्या. २०२४ साठी त्यांनी एका वाढीव जागेची मागणी केली आहे. ही वाढीव जागा कोल्हापूर किंवा हातकणंगलेची असू शकते.यापैकी कोणती जागा भाजपला जाणार याविषयी उत्सुकता आहे.
सद्यस्थितीत महायुतीतील राष्ट्रवादी व भाजपकडेही दोन्हीही मतदारसंघात प्रबळ उमेदवार नाही. जिल्ह्यात भाजप(BJP)चा एकही आमदार नाही.दोनपैकी एक तरी जागा भाजपला मिळावी,अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे.त्यातही कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपचे कार्यकर्ते आग्रही आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा अंतर्गत सर्व्हे केल्याचे समजते. या सर्व्हेतून काही धक्कादायक बाबी पक्ष नेतृत्त्वापर्यंत पोहचल्या आहेत. उमेदवारी देताना किंवा मतदारसंघाची अदलाबदल करताना या बाबी विचारात घेतल्या जाण्याची शक्यता आहे. दोन्ही जागांवर शिंदे गटाचा दावा ठाम असला तरी जिल्ह्यातील एका जागेच्या बदल्यात अन्य जिल्ह्यांतील एक जागा शिंदे गटाला देऊन त्याची भरपाई केली जाण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती होती. युतीत जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा हे दोन्ही मतदारसंघ त्यावेळच्या शिवसेनेच्या वाट्याला आले. कोल्हापुरातून प्रा. खासदार संजय मंडलिक तर हातकणंगलेतून खासदार धैर्यशील माने विजयी झाले.गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जिल्ह्यातील या दोन्ही खासदारांनी श्री. शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्य पातळीवर भाजप-सेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासह अन्य मित्रपक्षांची महायुती आकाराला आली आहे.त्यामुळे या तिघांत जागा वाटपाचा फार्म्यूला ठरल्याची माहिती आहे. (Kolhapur Politics)
‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजप नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा दोनपैकी एक जागेवर दावा केला आहे. कोल्हापूर किंवा हातकणंगले या दोन मतदार संघांपैकी एका जागेवर भाजपचा हक्क असल्याचा दावा केला. या दोनपैकी एक तरी जागा भाजपला मिळाली पाहीजे, अशी मागणी केली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.