Ahmednagar Death Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Advocate Couple Death : वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येमागे वेगळेच कारण? आता सीआयडी तपास करणार

Crime News : गुन्ह्यासंदर्भातील सद्यस्थितीचा अहवाल 5 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या सीआयडीला सूचना

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या राहुरीतील (जि. नगर) वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयाचे अप्पर पोलिस महासंचालक आता या गुन्ह्याचा तपास करणार आहे. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या गुन्ह्यासंदर्भात मूळ कागदपत्रे, केस डायरीसह तपासाची सर्व कागदपत्रे सीआयडीकडे हस्तांतरण करण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी केल्या आहेत. सीआयडीच्या पुणे कार्यालयाच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी देखील गुन्ह्याचे संपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेऊन सद्यस्थितीबाबतचा अहवाल 5 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारकेंनी केल्या आहेत.

राहुरीतील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करून 25 जानेवारीला हत्या झाली. या घटनेचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांमध्ये उमटले आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत नगर जिल्ह्यातील वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव घेतला आहे. तसेच या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यासाठी नगर जिल्ह्यासह राज्यातील वकील संघटनांकडून निदर्शने सुरू आहेत.

या हत्येत सराईत गुन्हेगार किरण नानाभाऊ दुशिंग ऊर्फ दत्तात्रय (रा. उंबरे), सागर साहेबराव खांदे ऊर्फ भैया (रा. येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक (रा. मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे), बबन सुनिल मोरे ( रा. उंबरे) या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. या घटनेतील तीन आरोपींनी राहुरी येथील न्यायालयात हत्येची माहिती दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वकील आढाव दाम्पत्याची पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी आणि 20 हजार रुपयांच्या वकील शुल्कासाठी हत्या झाल्याचे पोलिस सुरुवातीला सांगत होते. मात्र आढाव दाम्पत्याचे मृतदेह मिळाल्यानंतर मनीषा यांच्या मृतदेहावर पाच ते सहा लाख रुपयांचे दागिने आढळून आले. त्यामुळे पोलिस करत असलेल्या तपासावर वकील संघटनांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

नगर जिल्ह्यातील सर्व वकिलांनी राहुरी २९ जानेवारीला राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध सभा घेतली. या मोर्चातील वकिलांनी देखील पोलिसांच्या तपासाबाबत शंका व्यक्त केली. या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी करण्यात आली. यानंतर सीआयडीकडे तपास वर्ग करण्याची मागणीला जोर वाढला. राज्य सरकारने वकिलांच्या निदर्शनांची दखल घेत आज राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचा आदेश काढला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT