Ahilyanagar municipal election : महापालिका निवडणुकांचा प्रचाराचा उद्या मंगळवारी शेवटचा दिवस असून, तत्पूर्वी प्रशासन हवालामार्फत पैसे आल्याच्या संशयावरून छापासत्र सुरू केलं. यावरून अहिल्यानगर महापालिकेच्या माजी महापौर शीला शिंदे यांच्या घरी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा घातला. त्यावेळी घरी एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे होते. पोलिसांच्या मदतीने निवडणूक आयोगाच्या पथकाने अचानक घातलेल्या छाप्यानंतर, अनिल शिंदेंची प्रकृती खालवली, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
'पतीला काही झाल्यास त्याला आमदार आणि 'खासदार' जबाबदार राहतील,' असं त्यांच्या पत्नी माजी महापौर शीला शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अहिल्यानगर निवडणुकीतील प्रकाराची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, ते ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत. एकनाथ शिंदे उद्या अहिल्यानगर दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाल्याने मोठी रक्कम आल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस व निवडणूक यंत्रणेच्या भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी महापौर शीला शिंदे यांच्या निवासस्थानी छापा घातला. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद रक्कम अथवा साहित्य आढळून आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर अनिल शिंदे यांना धक्का बसला असून, त्यांची प्रकृती खालवल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख अनिल शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमवारी सायंकाळी ते घरी जेवणासाठी गेले असताना पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने त्यांच्या घरी अचानक छापा घालत, तपासणी सुरू केली. हवाल्यामार्फत मोठी रक्कम आल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष तपासणीत कोणतीही रक्कम किंवा आक्षेपार्ह बाब आढळली नाही.
याच दरम्यान अनिल शिंदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाला बोलावून संयुक्तपणे तपासणी करण्यात आली, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, सदर कारवाई ही निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने केली असून, त्यात पोलिस कर्मचारी सहभागी होते. तपासणीत कोणतीही रक्कम किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही.
दरम्यान, अनिल शिंदे यांच्या पत्नी माजी महापौर शीला शिंदे यांनी धक्कादायक खुलासा केला. त्या म्हणाल्या, "माझ्या पतीला काही झाल्यास, प्रशासन, आमदार आणि 'खासदार' याला जबाबदार राहणार आहे. निवडणूक सुरू झाल्यापासून प्रचंड दबाव आहे." पतीला काही झाल्यास प्रशासन, आमदार आणि खासदाराविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे शीला शिंदे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर यांनी, अनिल शिंदे यांच्या घरावर पोलिस प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी एकत्रित छापा घातला. पण त्यात काहीच आढळलं नाही. प्रशासनला हाताशी धरून शिवसेनेच्या उमेदवारांना त्रास दिला जात आहे. अचानक छापा घातल्याचा धक्का अनिल शिंदेंना बसला, त्यातून त्यांची प्रकृती खालवली, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून, ते मृत्यूशी झुंज देत आहे, असे सांगितले.
'एकनाथ शिंदे शिवसेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यापासून सत्ताधारी युतीची पायाखालची वाळू सरकली आहे. प्रचारात दडपशाही केली जात आहे. प्रचार पत्रक वाटू दिले जात नाही. 50-100 गुंड मागे सोडले जात आहेत. हरियाणातून गुंड आणले गेल्याची माहिती आहे. अहिल्यानगर शहराला नक्की कुठं घेऊन जायचं आहे. प्रशासन निवड लोकप्रतिनिधीचं बटीक म्हणून काम करत आहे. प्रशासनाचा निषेध करतोच. पण बाळासाहेबांनी न्याय कसा घ्यायचा हे शिवसैनिकांना शिकवलं आहे,' असा इशारा संजीव भोर यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.