Sujay Vikhe News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MP Sujay Vikhe : खासदार विखेंनी थोरात,ठाकरे, कोल्हे, आव्हाड अन् पवारांचं सगळंच काढलं...

Ahmednagar Political News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर केलेल्या टीकेचा खासदार सुजय विखे यांनी चांगलाच समाचार घेतला.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाचे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी राज्यातील राजकीय विरोधकांविरोधात जोरदार बॅटिंग केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार डाॅ. अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार या सगळ्यांविरोधात जोरदार टोलेबाजी केली.

महायुतीचा मेळावा उद्या (ता. 14) नगर शहरात होत आहे. या मेळाव्याच्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषद माध्यमांशी संवाद साधताना खासदार विखेंनी केलेली ही टोलेबाजी म्हणजे लोकसभेचे घमासान सुरू झाल्याचा बिगुल आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर केलेल्या टीकेचा खासदार सुजय विखे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, थोरात यांनी नगर दक्षिणेत एक मेळावा घेऊन दाखवण्याचे आव्हान दिले. आम्ही कमीत कमी मेळावे घेऊ शकतो. तुमचे मेळाव्याला लोक यायला तयार नाही. तुम्ही घ्या ना जिल्ह्यात मेळावे. तुम्ही जेवढे ज्येष्ठ नेते आहात, एखादा मेळावा नगर दक्षिणेत घेऊन दाखवा. किती लोक दक्षिणेचे येतात. तुम्हाला संगमनेरमधून सगळ्या गाड्या आणण्याची वेळ आली नाही, नशीब. तुमची परिस्थिती पाहण्यासाठी मेळाव्यात घेऊन पाहा. तुम्हाला अंदाज येईल. किती मोठा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची काय अवस्था आहे', असा टोला खासदार सुजय विखे(MP Sujay Vikhe) यांनी लगावला.

खासदार विखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे हे दुर्दैवाने मातोश्री बाहेर कधीच पडले नाहीत. महाराष्ट्रात काय राहिले आहे आणि काय गेले हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. त्यामुळे कोणीतरी त्यांना काहीतरी सांगत असेल किंवा चुकीची माहिती देत असेल, तर त्याला मी बदलू शकत नाही. नगर जिल्ह्यातील खासदार म्हणून येथे मागच्या एक वर्षात दोन-पाचशे एकराच्या एमआयडीसी जाहीर करण्यात यशस्वी झालो आहे. तिथे औद्योगिक वसाहती येणार आहे आणि त्या होणारच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता घराबोहर पडावे आणि विकसित महाराष्ट्र पाहाण्याचे काम करावे, असा टोला खासदार विखेंनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काही दिवसापूर्वी नगर दौऱ्यावर असताना, त्यांनी खासदार विखेंवर टीका केली होती. त्याचा समाचार देखील खासदार विखेंनी घेतली. खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांचे साडेचार वर्षांपैकी चार वर्षे शुटिंगमध्येच गेले आहेत. त्यामुळे कोणी बोलो न बोलो, पण कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाजू मांडूच नये, ही नम्र विनंती केली. मी त्यांचा स्वतः मित्र पण आहे. ते उत्कृष्ट अभिनेता आहेत. त्यांनी पूर्णवेळ अभिनयच करावा. त्यामुळे ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची वस्तुस्थिती माहीत नाही, त्या माणसाच्या टीकेला उत्तर देणे मला पटत नाही, असे खासदार विखे त्यांच्याविषयी म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मानसिकतेवर परिणाम

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आमदार रोहित पवार यांच्यावर खासदार सुजय विखे यांनी जोरदार हल्लाबोल केला. या नेत्यांची मानसिकतेवर परिणाम झाल्याचा टोला खासदार विखेंनी लगावला आहे. तलाठी भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आमदार पवारांनी खासदार विखेंनी चांगलेच सुनावले.

'तीन वर्षे राज्यात सरकार असताना, सत्ता असताना जे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकले नाही. तलाठी भरती हा आजचा विषय नाही. त्यांनी मग तीन वर्षे का केले नाही, त्यांचे सरकार होते. तलाठी भरती परीक्षा अतिशय पारदर्शकतेने झाली आहे. दोनशेच्या जागी जास्त गुण का हे गुणांकन पद्धती समजून घेणे आवश्यक आहे. जर त्यामागे चुक असेल, तर त्यांना न्यायालयात जाण्याची पूर्ण मुभा आहे. मीडियासमोर येऊन आरोप करण्यापेक्षा न्यायालयात दाद मागा. न्यायव्यवस्थेवर विश्वास असेल, तर ते चौकशी करून निवाडा करून देऊ शकतो असेही विखे म्हणाले.

तसेच जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, हे असे बोलल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या वैचारिकतेचा आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींचा बिघडलेल्या मानसिक संतुलनेचा परिणाम दिसतो. काही दिवसांनी यांना लोक रस्त्यावर फिरू देणार नाहीत, अशी यांची परिस्थिती होणार आहे. मागील तीन वर्षाचा लेखाजोखा त्यांनी मांडावा आणि आम्ही दीड वर्षात काय केले ते जनतेमध्ये जावून सांगत आहोत', असे खासदार विखे यांनी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT