Nashik, 19 july : ज्येष्ठ नेते शरद पवार आज (ता. १९ जुलै) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. निफाड येथे समर्थकांच्या मेळाव्याला ते संबोधित करतील. यानिमित्ताने अपरिहार्यपणे विधानसभा निवडणुकीची चर्चा होत आहे.
(कै) मालोजीराव मोगल यांच्या स्मृतीदिनानिमित्त नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चितेगाव फाटा येथे शेतकरी मेळावा होत आहे. मालोजीराव मोगल हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे अनुयायी होते. त्यांच्याबरोबर काम केलेल्या आणि विविध पक्षांमध्ये विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.
या निमित्ताने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शरद पवार समर्थक एकत्र येणार आहेत. त्यामुळे अपरिहार्यपणे आगामी विधानसभा निवडणुकीची बांधणी म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. म्हणूनच पवारांच्या या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हिशेबाची मांडणी होईल.
निफाड विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांत राजकीय वातावरण झपाट्याने बदलले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांची पवार यांच्याशी जवळीक वाढली आहे. त्याचवेळी एकेकाळी पवारांचे खंदे समर्थक असलेले आमदार दिलीप बनकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत मोठे पवार विरुद्ध छोटे पवार अशीच लढत रंगणार, हे स्पष्ट आहे. आजच्या दौऱ्यात छोटे पवार अर्थात अजित पवार गटाचे आमदार बनकर यांची विकेट पाडण्यासाठी पवार समर्थक व्यूहरचना करतील, यात शंका नाही. त्यासाठी शरद पवार काय कानमंत्र देतात, यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत ढोबळपणे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र असेल. आमदार बनकर महायुतीचे घटक आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी हमखास मांडली जाते. मात्र त्याचवेळी भाजपचे यतीन कदम यांनीही तयारी केली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनाही आमदारकीची स्वप्न पडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे व सध्या लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब शिरसागर यांनी आपली उमेदवारी या आधीच जाहीर केली आहे. पक्ष कोणता हे सोयीनुसार ठरण्याची शक्यता आहे.
हे तीनही उमेदवार बनकर यांचा विजय आणि पराभव दोन्हीसाठी कारणीभूत ठरू शकतात. गेल्या निवडणुकीत यतीन कदम यांना अदृश्य बळ देऊन बनकर विजयी झाले होते. यंदा हे तीन उमेदवार महायुतीची डोकेदुखी वाढवू शकतात.
शरद पवार समर्थकांच्या मेळाव्यात त्या दृष्टीने अजित पवारांचे आमदार बनकर यांची विकेट कशी पाडायची यावर खल होण्याचीच शक्यता आहे. पवार यांचा दौरा त्या दृष्टीने अजित पवार यांची आणि त्याचवेळी महायुतीची डोकेदुखी वाढवू शकतो. याच राजकीय दृष्टिकोनातून या दौऱ्याकडे सर्व नेते पहात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.