Bhusawal Sharad Pawar NCP News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का! भुसावळमध्ये दोन माजी नगराध्यक्षांसह 11 नगरसेवक शिवसेनेत

Bhusawal Sharad Pawar NCP News: भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद कमी झाली असून, शिवसेनेची स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

Mangesh Mahale

Bhusawal News : राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा जोर आला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पहासह अन्य पक्षांतील नेत्यांना आपल्या गटात आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असल्याचे दावे केले जात आहेत. भुसावळमधील पक्षप्रवेशामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.

शिवसेनेकडून विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांना आपल्या गटात आणण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याची चर्चा असतानाच भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेतील दोन माजी नगराध्यक्षांसह तब्बल 11 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

भुसावळमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवरील या पक्षांतरामुळे आगामी काळात भुसावळच्या राजकारणात नवीन आघाड्या आणि समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भुसावळ नगरपालिकेतील शरद पवार गटाच्या 11 नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेशामुळे भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद कमी झाली असून, शिवसेनेची स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

गायत्री भंगाळे यांच्या प्रवेशामागे नेमके कारण काय?

गायत्री भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशाची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा होत आहे. 2025 मध्ये झालेल्या भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत नगराध्यक्षपद मिळवले होते.

मात्र, त्यानंतर त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा पुढे आला. जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने त्यांना नगराध्यक्षपदावरून अपात्र ठरावे लागले. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक राजकारणात आपली राजकीय भूमिका मजबूत करण्यासाठी त्यांनी शिवसेनेचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शरद पवारांचे 11 नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे

गायत्री भंगाळे आणि अनिल चौधरी यांच्या प्रवेशानंतर त्यांच्या पुढाकाराने भुसावळ नगरपालिकेतील आणखी 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये गटनेते सचिन संतोष चौधरी, इक्बाल दिलनवाज शेख, उल्हास भीमराव पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन भास्कर पाटील, अकील नादर पिंजारी, शबाना बी. सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांचा समावेश आहे. या नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे भुसावळ नगरपालिकेतील राजकीय गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश

नगरसेवकांसोबतच काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. सिकंदर खान, नदीम सरकार, इसाक बागबान, ओमप्रकाश झा, गिरीश पारधी, महेंद्र चौधरी, नरसिंह तायडे, अनिकेत झा, नचिकेत मंदवाळे, आरिफ खान आणि आरिफ शेख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला.

भुसावळच्या राजकारणात नवे समीकरण?

भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात यापूर्वीही विविध पक्षांमध्ये सत्तासमीकरणासाठी संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता शरद पवार गटातील दोन माजी नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्याने स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

कुणाची ताकद वाढणार?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची तयारी सुरू असताना झालेल्या या पक्षप्रवेशाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात भुसावळमध्ये कोणता पक्ष आपली ताकद वाढवतो आणि या नव्या राजकीय समीकरणाचा स्थानिक सत्तेवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT