Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil's Statement: भाजपमध्ये ‘राष्ट्रवादी’चा पराभव करण्याचे सामर्थ्य नाही

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

Sampat Devgire

जळगाव : (Jalgaon) भारतीय जनता पक्षात (BJP) अद्यापही विरोधकांना पराभव करण्याचे सामर्थ्य नाही. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच माणूस शोधावा लागतो. त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला. (NCP state president criticize BJP in Jalgaon)

बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी श्री. पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीष महाजन यांनी केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा संदर्भ दिला.ते म्हणाले, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पवार यांना फोडून भाजप-शिवसेना शिंदे गटाने चेअरमनपद बहाल केले. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, की भाजपमध्ये स्वबळावर विरोधकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माणूस शोधावा लागतो. त्याशिवाय त्यांना कोणताही पर्याय नसतो.

शिंदे गटामुळे भाजपची किंमत घसरली

राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत जयंत पाटील म्हणाले, की राज्यात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला कोणतीही किंमत राहिलेली नाही. मात्र, त्यासोबतच भाजपची किंमत कमी झाली आहे. असंगाशी संग केल्यावर काय होते, ते आता भाजपला दिसून आले आहे. आगामी निवडणुकीत जनताही त्यांना दाखवून देईल.

एकनाथ शिंदे भाजपच्या प्रभावाखाली

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत जयंत पाटील म्हणाले, की एकनाथ शिंदे किती प्रभावाखाली काम करीत आहेत, हे जनतेला दिसून आले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रिपदाचे काम करीत आहेत, हेच जनतेला दिसून आले आहे.

महाविकास आघाडी म्हणूनच लढणार

राज्यातील आगामी निवडणुकाबाबत ते म्हणाले की, राज्यातील आगामी बाजार समिती, पालिका, महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत.

‘सहकारा’त पक्ष नसतो

जिल्हा बँक निवडणुकीत पक्षाचे संजय पवार यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन पक्षाविरोधी उमेदवारी करून चेअरमनपद मिळविले. त्यांच्यावर कारवाईचा प्रश्‍न विचारला असता, जयंत पाटील म्हणाले, की सहकारात पक्ष नसतो. त्यामुळे पक्षाध्यक्ष म्हणून मी त्यांच्यावर कारवाईची भूमिका घेऊ शकत नाही. त्याला पक्षांतर्गत महत्त्व देण्याची गरज नाही. मात्र, कार्यकर्त्यांच्या भूमिकेची आपण दखल घेतली आहे. त्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

खडसेंनी पक्ष सोडल्याने भाजप अस्वस्थ

भाजपचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी श्री. खडसे राष्ट्रवादीत गेल्यामुळे त्यांच्या जिल्हा दूध संघ, जिल्हा बँकमधील सत्ता गेली. आता आगामी निवडणुकीतही त्यांचा पराभव होईल. त्यावर जयंत पाटील म्हणाले, की एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पक्षातर्गंत बेरीज वाढली आहे. समाजाचे अनेक प्रश्‍न त्यांनी सोडविले आहेत. विधानपरिषदेतही राज्य सरकारची लक्तरे त्यांनी वेशीवर टांगली. त्यांच्यासारखा नेता पक्षातून गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाला आहे. त्यामुळेच भाजपचे नेते असे वक्तव्य करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT