Pathardi Political Leaders Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pathardi Politics : मंजूर रस्ता रोखणारा भाजपचा नेता कोण; प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानंतर नगरमध्ये चर्चा

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : पाथर्डीमध्ये एका नादुरुस्त रस्त्याची चर्चा सुरू आहे. तो म्हणजे करोडी-टाकळी मानूर! हा रस्ता भाजपच्या नेत्याने रोखला असून तो पूर्ण व्हावा, यासाठी भाजप सोडून इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येत प्रांताधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. रस्त्याचे काम न झाल्यास ६ डिसेंबरला आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच संबंधित भाजप नेत्याचे नाव जाहीर करणार असल्याचेही पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गहिनीनाथ शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

पाथर्डी तालुक्यातील करोडी ते टाकळी मानूर हा रस्ता मंजूर असूनही त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याबरोबरच महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांचा रोष वाढला आहे. या सर्व अडचणी घेऊन भाजप वगळून इतर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली. मंजूर रस्त्याचे काम न झाल्यास सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला.

राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे गहिनीनाथ शिरसाट, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विष्णूपंत ढाकणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के, माजी नगरसेवक बंडूपाटील बोरुडे, वैभव दहिफळे, पांडुरंग शिरसाट, डॉ. राजेंद्र खेडकर यांनी हे निवेदन दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'करोडी ते टाकळी मानूर या रस्त्याची परिस्थिती दयनीय झाली आहे. रस्ता असून नसल्यासारखा झाल्याने टाकळी मानूर व पंचक्रोशीतील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकांचे आर्थिक, तर शालेय मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रस्ता नसल्याने टाकळी मानूर गावची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. या खराब झालेल्या रस्त्यामुळे अपघात होऊन कित्येक सर्वसामान्यांना जीव गमवावा लागला, तर काही जण कायमचे जायबंदी झालेत. तरी या रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होऊनही कार्यारंभ आदेश दिला जात नाही. यामागे (BJP) भाजपच्या नेत्याचा हात आहे," असा आरोप गहिनीनाथ शिरसाट यांनी केला आहे.

रस्त्याचे काम चालू करण्यात यावे, अन्यथा पाथर्डी - शिरूर रस्त्यावर करोडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने आठ तास वीजपुरवठ्याची मागणी आहे. यावर कार्यवाही व्हावी. तसेच नादुरुस्त रोहित्र तीन दिवसांच्या आत दुरुस्त करून मिळावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT