Vidya Gaikwad
Vidya Gaikwad  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Political News : जळगावात मंत्री महाजन,पाटलांची शिष्टाई फळाला; महापालिका आयुक्तांवरचा अविश्वास प्रस्ताव भाजप मागे घेणार

कैलास शिंदे :सरकारनामा ब्यूरो

कैलास शिंदे

Jalgaon : भाजप, सत्ताधारी शिवसेना (ठाकरे गट),एमआयएम, शिवसेना(Shivsena) शिंदे गटाच्या तब्बल ५६ नगरसेवकांनी महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. महापौरांनी त्या प्रस्तावानुसार एक ऑगस्ट रोजी महासभेचे आयोजन केले होते.

मात्र,भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड व भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीतील चर्चेनंतर समझोता झाला आहे. आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्यावर आणण्यात आलेला अविश्‍वास प्रस्ताव उद्या सभेत मागे घेण्यात येणार आहे.

जळगाव महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड(Vidya Gaikwad) या जळगाव महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची महापालिकेतच आयुक्तपदावर नियुक्ती शासनाने केली होती. मात्र, काही महिन्यातच त्यांची बदली करून नवीन आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती.

त्या बदलीविरोधात त्यांनी मॅटमध्ये अर्ज दाखल केला होता. मॅटमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय लागला व त्यांची आयुक्तपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पुन्हा नियुक्तीला एक वर्ष होत असतानाच त्यांच्यावर आता अविश्‍वास प्रस्ताव देण्यात आला आहे.

भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मंगळवारी रोजी मतदान घेण्यात येणार होते. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट व एमआयएमच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यात भाजप, शिंदे गटाची सत्ता असताना व जिल्ह्यात दोन्ही पक्षाचे मंत्री असताना त्यांच्याच नगरसेवकांनी आणलेल्या या प्रस्तावाबाबत राजकीय पडसाद उमटत होते.

मंगळवारी प्रस्तावाच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिवसभर जोरदार राजकीय खलबते झाली. सायंकाळी जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil ), भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण , आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवक तसेच महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर समझोता होऊन आयुक्तावरील अविश्‍वास ठराव मागे घेण्याचा निर्णय झाला.

याबाबत माहिती देतांना भाजप नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले. महापालिका आयुक्त व नगरसेवक यांच्यात विकासकामांवरून वाद होते. बैठकीत चर्चा झाली. विकासकामांबाबत सुधारणा करण्यास आयुक्तांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार त्या कामात सुधारणा करणार आहेत. त्यामुळे शहरात विकासाची कामे वेगाने होणार आहेत. चर्चेमुळे नगरसवकांचे समाधान झाले असून अविश्‍वासाचा हा प्रस्ताव मागे घेण्यात येणार आहे.

विधानसभा अधिवेशन चालू असल्यामुळे आम्ही त्याठिकाणी होतो, त्याचदरम्यान, नगरसेवक व आयुक्तात मतभेद झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढे असे मतभेद होणार नाहीत असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT