Jalgaon : जळगाव महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड या जळगाव महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची जळगाव महापालिकेतच आयुक्त पदावर नियुक्ती शासनाने केली होती. मात्र काही महिन्यातच त्यांची बदली करून नवीन आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या बदलीविरोधात त्यांनी मॅटमध्ये अर्ज दाखल केला होता. मॅटमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय लागला व त्यांची आयुक्तपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पुन्हा नियुक्तीला एक वर्ष होत असतानाच त्यांच्यावर आता अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे.
भाजप, सत्ताधारी शिवसेना (ठाकरे गट),एमआयएम, शिवसेना(Shivsena) शिंदे गटाच्या तब्बल ५६ नगरसेवकांनी महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला आहे. महापौरांनी त्या प्रस्तावानुसार एक ऑगस्ट रोजी महासभेचे आयोजन केले आहे. महापालिकेत डॉ. प्रवीण गेडाम यांच्यानंतर अविश्वास ठराव येणाऱ्या या दुसऱ्या आयुक्त असणार आहेत.
जळगाव शहरातील समस्यासंदर्भात भाजप नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी गेल्या दोन दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांना महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट व एमआयएमच्या नगरसेवकांनी पाठींबा दिला आहे.महापालिका प्रशासन शहरातील विकास कामे करीत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. महापालिक आयुक्त या विकासाकडे दुर्लक्ष करत आहेत.
अनेकवेळा महासभेत तक्रारी करूनही त्या दखल घेत नसल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे. साखळी उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तावर अविश्वास ठराव आणण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार तब्बल ५६ नगरसेवकांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून महापौराकडे दिला आहे.
महापौर(Mayor) जयश्री महाजन यांनी हा प्रस्ताव आपल्याकडे आला असल्याचे सांगितले. राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यानंतर देखील सदर विनियोगात झालेला विलंब व कामाची गुणवत्ता राखण्यात आयुक्त पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत असे सभागृहाचे मत झाले आहे. त्यामुळे त्यांची पदावरून गच्छंती होणे आवश्यक आहे असे प्रस्तावात म्हटले आहे.
महाराष्ट्र अधिनियम कलम (३६)नुसार आयुक्तास असमर्थतता, गैरवर्तणूक, कर्तव्य पार पाडण्यात केलेली हयगय या मुद्यावरून त्यांना ताबडतोब काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर भाजप गटनेता राजेंद्र घुगे पाटील, एमआयएम गटनेता रियाझ अहमद बागवान, शिवसेना शिंदे गटाचे गटनेता दिलीप बबनराव पोकळे, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता अनंत उर्फ बंटी जोशी व विरोधी पक्षनेता शिंदे गटाचे सुनील महाजन यांच्यासह ५६ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगरसेवकांच्या आलेल्या प्रस्तावावर विधीशाखेचे मतही घेण्यात आले आहे. त्यानुसार एक ऑगस्ट रोजी प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.
अविश्वास प्रस्ताव येणाऱ्या डॉ. गायकवाड दुसऱ्या आयुक्त
डॉ. विद्या गायकवाड (Vidya Gaikwad) या अविश्वास प्रस्ताव येणाऱ्या दुसऱ्या आयुक्त असणार आहेत. यापूर्वी महापालिकेत डॉ.प्रविण गेडाम यांच्यावर सन २००६ मध्ये अविश्वास दाखल झाला होता.तो बहुमताने मंजूर झाला होता त्यानंतर त्यांची बदली झाली होती. त्यामुळे आता डॉ.विद्या गायकवाड यांच्यावर आलेल्या अविश्वास प्रस्तावाकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.