Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून महायुतीला नडले, पण बजेटवर नरमले; भुजबळ नेमकं काय म्हणाले ?

OBC Vs Maratha Reservation Issue : ओबीसी आरक्षणावरुन राष्ट्रवादीला इशारा देणाऱ्या भुजबळांवर कारवाई झाली तर त्यांना भाजपचा मोठा पर्याय असल्याची चर्चा

Arvind Jadhav

Nashik Political News : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेटचे मंत्री छगन भुजबळ यांनी तोंड भरून कौतुक केले. अंतरीम अर्थसंकल्प असतानाही सर्व घटकांचा सर्वसमावेशक विचार अर्थमंत्र्यांनी केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून स्वपक्षासह महायुतीला नडणाऱ्या भुजबळांनी बजेटबाबत स्तुतिसुमने उधळल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिक येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशातील अन्नाच्या समस्या दूर करत देशातील सुमारे 80 कोटी नागरिकांना मोफत अन्न, धान्य उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. देशातील गोरगरीब नागरिकांना दोन कोटी घरे बांधण्यात येणार आहे.

सौर ऊर्जा योजनेद्वारे एक कोटी घरांना 300 युनिटपर्यंत वीज माफ होणार आहे. पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरे महिलांना देण्याचा निर्णय घेतला. तसेच संसदेत महिलांना आरक्षण देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे. देशातील 3 कोटी महिलांना लखपती बनविण्यासाठी योजना आखल्या जात आहे, ही अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

बजेटबाबत बोलताना मत्स्य व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भुजबळांनी सरकारचे कौतुक केले. शेतीसाठी आधुनिक साठवणूक केंद्र उभारण्यासह पुरवठा साखळीवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली. देशातंर्गत विमान सेवा, रेल्वे, शिक्षण, महिला, गोरगरीबांना न्याय देणारा हे बजेट (Budget) आहे. अंतरिम असले तरी हे बजेट सर्वसमावेशक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारमधील मंत्री असलेले भुजबळांनी सध्या ओबीसी हक्कांसाठी लढा सुरू केला आहे. राज्यात मराठा समाजाविरूद्ध भुजबळ असे चित्र निर्माण झाल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्याने प्रश्न उपस्थित केले. यावेळी भुजबळांनी स्वपक्षाला ललकारत माझा ओबीसी लढा सुरूच राहील, तुम्हाला काय करायचे ते करा, असा थेट इशाराच दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनीही मंत्रिमंडळातून भुजबळांची हाकालपट्टी करण्याची मागणी केली. असे असले तरी भाजपचीही भीस्त ओबीसी समाजावर अवलंबून असल्याचे भुजबळांना पर्यायी पक्षाची व्यवस्था उभी असल्याची चर्चा रंगली. त्यातच आज भुजबळांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक केल्याने या चर्चेला हवा मिळाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT