Chhagan bhujbal sameer Bhujbal  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sameer Bhujbal : येवलेकर काकाप्रमाणे पुतण्याचेही राजकीय पुनर्वसन करणार का, भुजबळांच्या येवल्यात काय घडतंय?

Chhagan Bhujbal, Sameer Bhujbal Yeola politics : येवला हा राष्ट्रवादीचे जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. येवल्यात भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हे अधिक सक्रीय झालेले दिसतात.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ २००९ मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. त्यानंतर राजकारणात दोन वेळा त्यांच्या वाट्याला पराभवच आला. परंतु सध्या आपल्या काकांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात समीर हे अधिक सक्रीय झालेले दिसतात. मंत्री छगन भुजबळ केंद्रात गेल्यास येवल्यात त्यांचे पुतणे समीर भुजबळ पोटनिवडणूक लढवतील अशा चर्चा येवल्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत.

ज्याप्रमाणे येवलेकरांनी भुजबळांना साथ दिली. भुजबळांचे राजकीय पुनर्वसन येवलेकरांनी केले. त्याचप्रमाणे पुतण्या समीर यांचेही राजकीय पुनर्वसन येवलेकर करणार का? अशा चर्चा सध्या येवल्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

भुजबळ हे आजारी असल्याने बऱ्याच दिवस मुंबईत उपचार घेत होते. अशात त्यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ हे येवल्यात सर्वाधिक सक्रीय झालेले दिसले. मंत्री भुजबळांच्या अनुपस्थितीत येवला नगरपरिषद निवडणुकीची सगळी धुरा समीर भुजबळांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. ती निवडणूक पार पडल्यानंतर जिल्ह्यात कोणतीही निवडणूक नसतानाही समीर भुजबळ हे येवल्यातील गावागावात जाऊन विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संपर्क वाढवताना दिसत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. जिल्हापरिषद निवडणुकही आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने आजून निश्चित नाही. असे असतानाही समीर भुजबळ दिवसरात्र येवल्यात सक्रीय आहेत. जनतेच्या संपर्कात आहे. विविध गावांमध्ये त्यांचे संवाद दौरे होत आहेत. मंत्री भुजबळांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजनही समीर भुजबळ यांच्याच हातून होत आहे.

त्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार का? त्यानंतर येवल्यात पोटनिवडणूक होऊन समीर भुजबळ ही निवडणूक लढवणार का? अशा खमंग चर्चा येवल्यात सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून समीर भुजबळ हे येवल्यात जनसंपर्क मोहिमेत अडकले आहेत असे बोलले जात आहे.

गेल्या दोन महिन्यात समीर भुजबळ यांनी येवल्यात विविध उपक्रम राबवले. येवल्यातील विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला. गेल्या दोन महिन्यात समीर भुजबळ व डॉ. शेफाली भुजबळ यांच्या उपस्थितीत येवल्यातील महिला बचत गटांसाठी विविध मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात आली होती. २६ जानेवारी ला समीर भुजबळ यांच्या हातून येवल्यातील संपर्क कार्यालयात ध्वजारोहण झाले. सण-उत्सव असो की दुख्खाचा प्रसंग समीर भुजबळ येवलेकरांसोबत त्यांच्या प्रत्येक प्रसंगात उभे आहेत.

छगन भुजबळ बंड करुन शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी काहीही करुन भुजबळांना धडा शिकवून घरी बसवायचा चंग बांधला होता. त्यानुसार १९९५ च्या निवडणुकीत माझगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या बाळा नांदगावकर यांनी भुजबळांचा पराभव केला होता. माझगावचा हा पराभव भुजबळांच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर ते दोनदा विधानपरिषद सदस्य होते पण भुजबळांना विधानसभा गाजवायची असल्याने त्यांनी सुरक्षित मतदार संघ शोधणे सुरु केलं होतं. अशात त्यांना येवलेकरांनी पदरात घेतलं. २००४ मध्ये येवलेकरांनी विधानसभा निवडणुकीत भुजबळांना निवडून आणत आमदार केलं. भुजबळाचं राजकीय पुनर्वसन येवलेकरांनी केलं. त्यानंतर सलग पाच वेळा भुजबळ येवल्यातून निवडून आले. अनेकदा मंत्री झाले.

मात्र, समीर भुजबळ २००९ मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. परंतु त्यानंतर २०१९ मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर २०२४ मध्ये समीर भुजबळांनी नांदगावमधून शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्याविरोधात अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली त्याही निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यामुळे समीर भुजबळांच्या राजकीय करिअरला मोठा ब्रेक लागला.

अशात आता येवल्यात सुरु असलेल्या हालचाली व चर्चा पाहाता, छगन भुजबळ हे राज्यसभेवर गेल्यास येवल्यात पोटनिवडणूक होईल. पुतणे समीर भुजबळ हे ही पोटनिवडणूक लढवतील. मात्र ज्या प्रमाणे येवलेकरांनी २००४ मध्ये छगन भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन केले. त्याचप्रमाणे येवलेकर त्यांचे पुतणे समीर यांचेही राजकीय पुनर्वसन करणार का? अशी चर्चा येवल्याच्या राजकीय वर्तुळात आहे. येवल्यात झालेली नगरपरिषद निवडणूक याच पोटनिवडणुकीची रंगीत तालीम होती असेही बोलले गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT