Balasaheb Thorat sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat News : ...अन् संयमी थोरात जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले; नेमकं काय घडलं?

Pradeep Pendhare

अहमदनगर : 9 मार्च | माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात हे जिल्हा प्रशासनावर चांगलेच संतापले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी करणारे उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्या बेमुदत उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आमदार थोरातांचा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या कार्यपद्धतीवर पारा चढला आहे. "सरकार म्हणजे तुम्ही काय समजता. माणसे मेली तरी चालेल, अशी तुमची भावना आहे का?", अशा शब्दांत आमदार थोरातांनी ( Balasaheb Thorat ) जिल्हा प्रशासनाला फटकारले आहे.

संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथील उपसरपंच सुभाष डोंगरे यांचे पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासाठी गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाकडे आणि मागणीकडे दुर्लक्ष केले. आमदार थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी दखल घेत आंदोलनस्थळी धाव घेतली. तिथे आंदोलनकर्ते सुभाष डोंगरे यांची भेट घेतली. त्यांची खालावलेली प्रकृती आणि त्यांची रास्त मागणी पाहून आमदार थोरातांनी जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ, जांबुत खुर्द, जांबुत बुद्रुक, मांडवे, साकूर, बिरेवाडी, शिंदोडी तसेच पारनेर तालुक्यातील देसवडे, पोखरी, मांडवे खुर्द, टेकडवाडी या नदीकाठच्या गावांना सध्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यासाठी पिंपळगाव खांड धरणातून मुळा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जांबुत बुद्रुकचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. आंदोलनाचे दिवस वाढत असतानाच प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. याची माहिती आमदार थोरात यांना मिळाली. आमदार थोरात यांनी तडक आंदोलनस्थळ गाठले. उपसरपंच डोंगरे यांची आंदोलनामुळे खालावलेली प्रकृती पाहून त्यांनी जिल्हा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

आमदार थोरात यांनी डोंगरे यांना आश्वासन देत या पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यानंतर आमदार थोरात यांच्याहस्ते लिंबूपाणी घेऊन डोंगरे यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, प्रातांधिकारी, तहसीलदार किंवा स्थानिक प्रशासनातील अधिकारी नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आमदार थोरात यांनी संताप व्यक्त केला.

आमदार थोरात म्हणाले, "सरकार म्हणजे, तुम्ही काय समजता. माझ्यासाठी नाही. पण, गेल्या आठ दिवसांपासून जे बेमुदत उपोषण करत आहेत, त्यांच्यासाठी तरी येथे येणे गरजेचे होते. माणसे मेली तरी चालेल ही भावना तुमची आहे का? तुम्ही जिल्हाधिकारी आहात. पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी तुमची आहे. पाणी सोडण्यास अडचण नाही. अडचणी सांगू नका. पाणी सुटले पाहिजे."

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT