Advay Hiray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News: दादा भुसेंचा पाय खोलात, 'आता जिगरी यारच देणार आव्हान'!

Rashmi Mane

Malegaon Shivsena Politics: पालकमंत्री दादा भुसे यांनी आपले विरोधक अद्वय हिरे यांच्या मागे पोलिसांचा ससेमीरा लावला. मात्र विधानसभा मतदारसंघात त्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसत आहे.

पालकमंत्री भुसे यांना त्यांच्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी भुसे यांनी अद्वय हिरे (Advay Hiray) आणि माजी आमदार अपूर्व हिरे या दोघांविरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले होते. यामध्ये अद्वय हिरे अटक झाली आहे. ते अद्याप जामीनाच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात येत्या 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. यावेळी हिरे यांना जामीन मिळतो की नाही याची उत्सुकता आहे.Dada Bhuse News

हिरे यांच्या मागे खटल्यांचे शुक्लकाष्ठ लागल्याने मंत्री भुसे यांना काहीशी उसंत मिळाली होती. मात्र, बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती सध्या दिसू लागली आहे. दादा भुसे यांचे घनिष्ठ मित्र आणि बारा बलुतेदार संघटनेचे नेते बंडू काका बच्छाव मालेगाव बाह्य मतदारसंघात तयारी करीत आहेत. त्यामुळे भुसे यांना हिरे यांच्या एवढेच मोठे आव्हान बच्छाव देऊ शकतात एकेकाळचे जिवलग मित्र असलेले बंडू काका बच्छाव भुसे यांच्यापासून दुरावले आहेत त्यामुळे आता ते थेट विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत.

मालेगाव शहरातील रमजानपुरा परिसर बाह्य मतदारसंघात समाविष्ट आहे. जवळपास तीस हजार अल्पसंख्यांक मते येथे आहेत. येथील मशिदीत काम करणारे वीस बांगी (बांग देणारे) आणि इमाम यांना उमरा यात्रेसाठी तर मंदिरांची सेवा करणाऱ्या 50 सेवेकऱ्यांना चारधाम यात्रेसाठी पाठविण्याचा निर्णय बच्छाव यांनी घेतला आहे. याच भागातील गरीब कुटुंबीयांमध्ये वाटप केला होता. या भागात आग लागल्यानंतर त्यांची घरे बांधून देण्याचे काम देखील बच्छाव यांनी केले होते. हिरे यांच्यावरील कारवाईनंतर बच्छाव पुन्हा एकदा राजकीय संपर्काच्या कामात सक्रिय झाले आहेत. Malegaon Shivsena Politics

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री भुसे यांच्या विरोधात मालेगाव बाह्य मतदार संघात त्यांच्या विरोधकांनी जोरदार राजकीय मोर्चा बांधणी सुरू केली आहे. हिरे यांना दुखावल्यामुळे अद्वय हिरे समर्थक देखील अधिक सक्रिय झाले आहेत. अशा परिस्थितीत सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले सुनील गायकवाड हिरे आणि काँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे हे सर्व एकत्र येऊन बच्छाव यांना पडद्यामागून ताकद देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री भुसे आपल्या मतदारसंघात विरोधकांना नामोहरम करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा स्वतःच अडचणी देण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यासाठी दाद भुसे धुळे हा मतदारसंघ आपले चिरंजीव अविष्कार भुसे यांच्यासाठी मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांचे विरोधक विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करीत असले, तरीही त्याची पहिली झलक लोकसभा निवडणुकीतच दिसून येण्याची शक्यता आहे. येत्या 18 फेब्रुवारीला हिरे यांना जामीन मिळाल्यास, पुन्हा एकदा या भागातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. एकंदरच भुसे यांचा पाय आणखी खोलात अशी येथील राजकीय स्थिती निर्माण होऊ शकते.

Edited By : Rashmi Mane

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT