Devendra Fadnavis-Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : फडणवीसांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संपवली, खराब केली अन्‌ नासवली; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Vijaykumar Dudhale

Shirdi, 02 August : महाराष्ट्रात यापूर्वी अनेक पक्षाचे अनेक लोक राजकारण करून गेले. पण, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती देवेंद्र फडणवीस यांनी जितकी संपवली, खराब केली आणि नासवली.

फडणवीसांनी जे सुडाचे राजकारण केले, तसं राजकारण यापूर्वी कोणीही कधीही केलेले नव्हतं, त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवायची आणि नाही टिकवायची, याचा विचार महाराष्ट्राने करायचा आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) आज (ता. 02 ऑगस्ट) शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीकास्त्र सोडले. मी राहीन की फडणवीस राहतील, या उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर महाराष्ट्राने विचार करायचा आहे की, राजकारणात आता कोणाला ठेवायचे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण हे राज्याला विचार करायला लावणारे आहे. त्यांची यापूर्वीची भाषणे पाहिली तर इतकं रागावून, चिडून, निर्वाणीचं, निखराचं आणि आर या पारचे भाषण कधीही त्यांनी केलेले नाही. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच त्यांनी ललकारले आहे.

देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्राने पाच वर्षे मुख्यमंत्रिपद दिलं. त्या मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवून आपलं राजकारण स्थिर करायला पाहिजे होतं. राजकारण आणखी मजबूत करायलं पाहिजं होतं. पण त्याऐवजी फडणवीसांनी आपल्या मित्रांना, विरोधकांना आणि स्वपक्षीयांना संपविण्याचा सपाटा लावला होता. त्यातीलच एक भाग देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत केला होता. त्याच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी अत्यंत निकाराचा लढा पुकारला आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी तेच साद घालून सांगितलं आहे की, एक तर मी शांत, संयमी कोणाबद्दलही सुडानं न वागणारा माणूस पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खुनशी राजकरणी, सुडानं वागणारा आणि सत्तेचा दुरुपयोग करणारा आणि मित्र, विरोधक आणि स्वपक्षातील लोकांनासुद्धा न सोडणारे देवेंद्र फडणवीस पाहिजेत, हे ठरविणारे ते ‘एक तर मी राहीन किंवा देवेंद्र फडणवीस राहतील,’ असे शब्द आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने ठरवायचं आहे की उद्धव ठाकरेंचं राजकारण टिकवायचं की देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण टिकावायचे, असेही जाधव यांनी नमूद केले.

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे आव्हान स्वीकारले आहे. मी कोणाच्या शेपटीवर पाय देत नाही. पण माझ्या दिल्यावर मी कोणाला सोडत नाही, असा इशारा दिला आहे. त्यावर भास्कर जाधव म्हणाले, देवेंद्र फडणवीस बोलतात एक आणि करतात वेगळं. त्यांच्या साळसूद चेहऱ्यामागं लपलेला तो दुष्ट भाव संपूर्ण लोकांना कळला आहे. त्यांच्या पक्षातील, विरोधकांना आणि सर्व पक्षातील लोकांना कळला आहे.

फडणवीसांचा तो चेहरा केवळ दिखाऊपणा आहे. पण सत्तेचा दुरुपयोग करून, विरोधकांचा सुड कसा घेता येईल, विरोधक कसे फोडता येतील. विरोधी पक्ष कसे संपवता येतील आणि मीच एकटा कसा महाराष्ट्रात राहीन, हे त्यांचे विकृत स्वप्न असलेला चेहरा आहे. पण महाराष्ट्राने तो चेहरा आता नाकारलेला आहे, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT