Solapur, 02 August : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख राज ठाकरे हे येत्या चार आणि पाच ऑगस्ट रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे हे तब्बल पाच वर्षांनंतर सोलापुरात येत आहेत, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा हा दौरा होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे रविवारी (ता. 4 ऑगस्ट) सोलापूरमध्ये येणार आहेत. सोलापूरच्या (Solapur) प्रश्नावर राज ठाकरे हे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा करणार आहेत.
शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम असून सोमवारी (ता. 5 ऑगस्ट) ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मनसेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या अकरा जागा आहेत. या सर्व जागांचा आढावा मनसेप्रमुख राज टाकरे यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे. विधानसभानिहाय या बैठका होणार आहेत. या अकरा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. त्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढविण्याची स्ट्रॅटेजी ठरवली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी किती आणि कोणत्या मतदारसंघातून मनसे निवडणूक लढविणार, याची चर्चाही या बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्या ताकदीचे उमेदवारही मनसेला शोधावे लागणार आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांच्या स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचा फटका कोणाला बसतो आणि कोणाला फायदा होतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.