Devendra Fadnavis-Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Fadnavis Vs Khadse : देवेंद्र फडणवीस सर्वात अपयशी गृहमंत्री; खडसेंनी पुन्हा डिवचले...

NCP Shirdi Rally : वाढत्या गुन्हेगारीसमोर पोलिस लाचार झाले आहेत. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना अडकवले जात आहेत.

Pradeep Pendhare

Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या व्यासपीठावरून भाजपनेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज्यात सर्वात अपयशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असेल, तर देवेंद्र फडणवीस हे आहेत, अशी जोरदार टीका एकनाथ खडसे यांनी केली. (Devendra Fadnavis Most Failed Leader : Eknath Khadse)

नेते एकनाथ खडसे यांनी या अधिवेशनातून भाजपचे संपूर्ण वस्त्रहरण केले. एकनाथ खडसे म्हणाले की, "भाजपनेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सर्वात अपयशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिले आहेत. तसे ते ठरलेदेखील आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ म्हणजे, महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढलेला काळ, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाढत्या गुन्हेगारीसमोर पोलिस लाचार झाले आहेत. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना अडकवले जात आहेत. पोलिस यंत्रणेचा वापर सत्ता टिकवण्यासाठी केला जात आहे. परंतु घाबरू नका. खरे बोलायला शिका. संघर्ष सुरू आहे. आता तो दिवसात नाही, तर तासावर आला आहे. कामाला लागा. हे युद्ध आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. रान उठवायला सज्ज व्हा, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले.

आमदार खडसे यांनी अधिवेशनात सहभागी झालेल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फडणवीस आणि अजित पवार एकमेकांना कशा शिव्या घालत होते, याची आठवण करून दिली. एकनाथ खडसे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकमेकाला शिव्या घालत होते. परंतु आज तेच एकमेकांच्या शेजारी बसून सत्ता चालवत आहेत. आमच्याकडील सरकार जबरदस्तीने खेचले गेले. आमदार विकले गेले. गद्दारी झाली. बाजारूपणा या भाजपच्या काळात सुरू झाला आहे."

अजित पवार यांना शरद पवार यांच्याच आशीर्वादामुळे अनेक पदे मिळाली, त्यांना पक्षाने मोठे केले आहे, आता तेच फुटले. हे पाप अजित पवार कोठे फेडणार, याचे उत्तरदेखील त्यांना देता येणार नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी पदाधिकारी आणि नेत्यांना निवडणुकांना समोरे जाताना संघर्षाची तयारी ठेवण्याची सूचना केली. निवडणुका समोर आहेत. वेळ कमी आहे. तासात हा वेळ मोजा आणि कामाला लागा. पक्ष संघटनेतील मतभेद काय असतील, ते शरद पवार आणि आम्ही पाहून घेऊ. दिल्लीत जर प्रतिष्ठा वाढवायची असेल, तर १० ते १२ खासदार आपले निवडून आलेच पाहिजेत, असेही खडसेंनी सांगितले.

राज्यात वेगवेगळे मुद्दे आहेत. शेतकरी हवालदिल आहे. दुधाचे भाव कोसळले आहेत. आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. यातून आत्महत्या वाढल्या आहेत. महिला सुरक्षित नाही. विकासावर भाजप सत्ताधारी बोलायला तयार नाही. सत्तेत मदमस्त झाले आहेत. महाराष्ट्र ओरबाडला जात असताना आपण गप्प का, असा सवाल करीत श्रीरामाचे नाव घेणाऱ्यांना त्याचा जाब विचारा. बोला. सांगत राहा. यातून परिवर्तन होईल, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT