Ram Shinde News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde News : " राम शिंदेंकडून राजकीय स्वार्थापोटी धनगर समाजाची दिशाभूल!" ; 'या' नेत्याचा गंभीर आरोप

Dhangar Reservation News : ...तर त्यांनी २४ तासांत खुलासा करावा!

Deepak Kulkarni

Ahmednagar News : राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनानंतर धनगर समाजातील नेते, संघटनांनी आरक्षणासाठी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले असतानाच भाजप नेते,आमदार राम शिंदे आणि धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांच्यात जुंपली आहे.

यशवंत सेनाप्रणित धनगर आरक्षण दसरा मेळावा मंगळवारी चौंडी येथे झाला. या मेळाव्यात शिंदे यांनी समाजाची फसवणूक करणारी माहिती दिल्याचा आरोप धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम विक्रम ढोणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ढोणे म्हणाले, भाजप नेते,आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे राजकीय स्वार्थापोटी धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत. आरक्षणप्रश्नी धनगर समाजाला सोयीस्कर ठरणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिल्याचे सांगून शिंदे हे स्वतःची भलावण करून घेत आहेत. वस्तुतः शिंदे सांगत असलेला मजकूर त्या प्रतिज्ञापत्रात नाही. चार वर्षांपासून राज्य शासनाचे ते प्रतिज्ञापत्र कूचकामी ठरले आहे. त्यामुळे शिंदे यांच्याकडून दिल्या जात असलेल्या अर्धवट माहितीचा आम्ही निषेध करत आहोत. तसेच आमदार शिंदेंनी चौंडी येथे प्रतिज्ञापत्र घेऊन समोरासमोर चर्चेला यावे , असे आव्हानही ढोणेंनी या वेळी दिले.

राम शिंदे काय म्हणाले...?

मी मंत्री असताना २४ तासांच्या आत महाराष्ट्र शासनाने राज्यात धनगड नसून धनगर आहेत, असे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दिले आहे. यानिमित्ताने राम शिंदे यांनी स्वतःची फुशारकी मारून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या, पण त्यांना आपल्याच समाजाची किती दिशाभूल करावी, याचे भान राहिले नाही. धनगर(Dhangar Reservation) एसटी आरक्षण हा समाजाचा अतिशय संवेदनशील विषय आहे. गेल्या आठवड्यात या प्रश्नावरून दोन आत्महत्या झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याप्रश्नी गंभीर चिंतन होणे गरजेचे आहे.

फडणवीस सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय..?

भारतीय जनता पक्षाने २०१४ ला एसटी आरक्षणाचे आश्वासन देऊन समाजाची मते मिळवली. देशात व राज्यात सत्ता मिळविल्यानंतर मात्र सोयीस्करपणे या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. दरम्यानच्या काळात काही समाज बांधवांनी आरक्षणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत महाराष्ट्र शासन प्रतिवादी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्या प्रतिज्ञापत्रात राज्यात धनगड आढळून येत नसल्याचे म्हटले आहे.

विक्रम ढोणेंचे आरोप काय...?

धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम विक्रम ढोणे यांनी न्यायालयात सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र राम शिंदे यांच्या पुढाकारातून दाखल झाल्याचा त्यांचा दावा आहे. उच्च न्यायालयातील रिटपिटीशन ४९१९/२०१७ चा संदर्भ पाहता धनगडच्या जागेवर धनगर अपेक्षित आहे. धनगर समाजाचीही ती भावना आहे. मात्र, राम शिंदे प्रतिज्ञापत्रातील अर्धवट माहिती समाजाला सांगत आहेत. राज्यात धनगड नाहीत, असे प्रतिज्ञापत्रातील पहिल्या मुद्द्यात नमूद आहे.

पण त्या ठिकाणी धनगडऐवजी धनगर आहे, असेही कुठेही म्हटलेले नाही. दुसऱ्या मुद्द्यात १९६१ ला एक धनगड आढळल्याचे म्हटले आहे. या बाबी पाहता हे प्रतिज्ञापत्र कूचकामी ठरले आहे म्हणून हे प्रतिज्ञापत्र दाखल होऊन साडेचार वर्षे झाली तरी उच्च न्यायालयातून आरक्षणाला पोषक काही घडामोड झालेली नाही, असे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.

...तर त्यांनी २४ तासांत खुलासा करावा!

राम शिंदे यांनी भाषणात सांगितल्यानुसार महाराष्टात धनगड नसून धनगर आहेत, असे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. आमच्या माहितीनुसार चार मुद्द्याच्या प्रतिज्ञापत्रात एसटी आरक्षणाचा साधा उल्लेख केलेला नाही. एसटीच्या यादीत क्रमांक ३६ वर धनगडऐवजी धनगर आहे, असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात गरजेचा होता.

पण तसा केलेला नाही. उलट महाराष्ट्रात यापूर्वी धनगड होते, असे लिहून देण्यात आले आहे. त्यामुळे ते प्रतिज्ञापत्र कुचकामी आहेच, शिवाय समाजाच्या विरोधातले आहे. याउपर शिंदेंकडे काही वेगळे प्रतिज्ञापत्र असेल, तर त्यांनी २४ तासांत खुलासा करावा, असे आव्हानही ढोणे यांनी दिले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT