Shivsena Office Nashik
Shivsena Office Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shinde Vs Thackeray : मुख्यमंत्र्यांचा आदेश अन् आनंद दिघेंशी संबंधित 'ते' कार्यालय पाडले

Sampat Devgire

Nashik News, 30 June : विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने सत्ताधारी पक्ष इरेला पेटला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सुडाचे राजकारण जोमात आहे. त्याचा फटका चक्क आनंद दिघे यांच्याशी संबंधित एका कार्यालयाला बसला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devayani Farande) यांच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसला. त्यामुळे आमदार फरांदे या विधानसभेत काय घडणार? या चिंतेने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधकांना शिंगावर घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे कार्यकर्त्यांत बोलले जात आहे.

या राजकीय डावपेचाचा भाग म्हणूनच त्यांनी शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका येथील कार्यालयावर अतिक्रमण विभागाचा हातोडा चालवला. त्याचा गीते यांना राजकीय फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. यानिमित्ताने फरांदे यांच्यावर शेलक्या या शब्दात टिका करण्याची संधी शिवसेनेला आयती मिळाली आहे.

हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. मात्र महापालिका अतिक्रमण अधिकारी नेरे हे देखील या राजकारणाचा भाग बनले. महापालिकेने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ३ जुलै पर्यंतचा कालावधी मागितला होता. त्याआधीच महापालिकेने हे कार्यालय पाडले. ही कारवाई करण्यासाठी आमदार फरांदे मुख्यमंत्री कार्यालयात ठाण मांडून बसल्या होत्या. तेथून त्यांनी महापालिका आयुक्तांवर राजकीय दबाव आणला. असा आरोप माजी आमदार गीते यांनी केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सातत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेतात पाडण्यात आलेल्या कार्यालयात एकेकाळी आनंद दिघे चार दिवस मुक्कामी होते. शिवसेनाप्रमुख अनेकदा या कार्यालयात येऊन गेले आहेत. मात्र राजकीय सुडाच्या राजकारणात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातून हे कार्यालय पाडण्यात आल्याची खंत शिवसेना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT