Mangesh Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mangesh Chavan : गिरीश महाजनांचे 'राइट हँड' ते उत्तराधिकारी... दिग्गजांना मागे टाकत मंगेश चव्हाण ठरले Dark Horse

Girish Mahajan, Mangesh Chavan : एका सार्वजनिक कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. पक्षाची धुरा मंगेश चव्हाणांसारख्या चांगल्या हातात द्यावी लागेल असे म्हणत त्यांनी आपला राजकीय वारसदारही जाहीर केला.

Sampat Devgire

Jalgaon Politics : उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत एक मोठा बदल शांतपणे घडत होता. जळगाव, नाशिक भाजपची सूत्रे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या हातात ठेवली. त्याचवेळी आपला राजकीय वारसही तयार केला. आतापर्यंत मंगेश चव्हाण हेच गिरीश महाजन यांचे राजकीय वारसदार असू शकतात, अशी चर्चा दबक्या आवाजात व्हायची. पण मंगळवारी (२९ जुलै) चाळीसगाव येथील कार्यक्रमात महाजन यांनी वारसदाराची घोषणाच केली.

एका सार्वजनिक कार्यक्रमात महाजनांनी "वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार, जास्तीत जास्त आणखी एखादी टर्म... पक्षाची धुरा मंगेश चव्हाणांसारख्या चांगल्या हातात द्यावी लागेल" असे वक्तव्य करत आपल्या राजकीय निवृत्तीचे आणि चव्हाणांच्या नेतृत्वाचे संकेत दिले. महाजन यांनी प्रथमच हा संदेश जाहीरपणे दिला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे भविष्यातील नेतृत्व आमदार मंगेश चव्हाण यांच्या हाती देण्याची तयारी सुरू झाली हे स्पष्ट झाले आहे.

'प्रोजेक्ट मंगेश'

२०१९ पासून सुरू झाला 'प्रोजेक्ट मंगेश'

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मंगेश चव्हाण यांना उमेदवारी मिळणे हा त्यांच्या राजकीय प्रवासातील पहिला मोठा टप्पा होता. त्यावेळी विद्यमान आमदार उन्मेष पाटील लोकसभेत गेले आणि चाळीसगावची जागा चव्हाणांसाठी खुली झाली. अंतर्गत विरोध असूनही महाजन ठाम राहिले आणि चव्हाण पहिल्यांदा आमदार झाले.

कमी मताधिक्यापासून ७० हजारांच्या विजयापर्यंत

पहिल्या निवडणुकीत अल्प मताधिक्याने जिंकलेल्या चव्हाणांना पुढील पाच वर्षांत महाजन यांनी विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. मतदारसंघात रस्ते, सिंचन आणि पायाभूत सुविधांची कामे झाली. त्याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण तब्बल ७० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले.

दूध संघातून मिळाले सहकारातील नेतृत्व

महाजन यांनी चव्हाण यांच्यावर सर्वाधिक विश्वास दाखवला तो जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत. संपूर्ण रणनीती त्यांच्याकडे सोपवली. या विजयामुळे चव्हाण सहकार क्षेत्रातही मोठे नेते म्हणून पुढे आले. विशेष म्हणजे या विजयाने एकनाथ खडसे गटालाही मोठा राजकीय धक्का बसला.

नाशिकची सूत्रेही चव्हाणांकडे

जळगावपुरतेच नव्हे तर नाशिकमधील संघटनात्मक बैठका, कुंभमेळा प्राधिकरण आणि विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये महाजनांसोबत कायम मंगेश चव्हाण दिसू लागले. नाशिकमधील अनेक वरिष्ठ आमदार असतानाही महाजन यांनी चव्हाण यांच्यावरच विश्वास दाखवला. त्यामुळे त्यांना "प्रति गिरीश महाजन" अशी ओळख मिळाली.

कोणाचा झाला राजकीय बळी?

या संपूर्ण प्रक्रियेत सर्वाधिक फटका बसला तो माजी खासदार उन्मेष पाटील यांना. चव्हाण यांचे वाढते महत्त्व आणि पक्षातील बदललेली समीकरणे यामुळे त्यांचे लोकसभेचे तिकीट गेले आणि अखेर त्यांनी भाजप सोडली. याशिवाय जयकुमार रावल, संजय सावकारे, सुरेश भोळे यांसारखे उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते असतानाही निर्णयप्रक्रियेचे केंद्र महाजन-चव्हाण जोडीभोवती फिरू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कायम राहिली.

महाजनांनी मंगेश चव्हाण यांनाच का निवडले?

१) महाजन यांच्यावरील निर्विवाद निष्ठा

गिरीश महाजन यांच्या राजकारणाचा पाया हा व्यक्तिनिष्ठ निष्ठेवर उभा आहे. स्वतःचे स्वतंत्र सत्ताकेंद्र उभे करणाऱ्या नेत्यांपेक्षा आदेशाचे पालन करणाऱ्या नेतृत्वाला ते नेहमी पुढे आणतात. मंगेश चव्हाण यांनी गेल्या सहा वर्षांत कधीही स्वतंत्र भूमिका घेऊन महाजनांना अडचणीत आणली नाही. उलट जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय संघर्षात ते महाजन यांची भूमिका ठामपणे मांडताना दिसले.

जळगावमधील संघटनात्मक बैठक असो, नाशिकमधील राजकीय कार्यक्रम असो किंवा पक्षाच्या पडद्यामागील रणनीती; महाजन यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांमध्ये चव्हाण कायम दिसले. त्यामुळे पक्षात "महाजन बोलले म्हणजे चव्हाण अमलात आणतात" अशी प्रतिमा तयार झाली.

२) आक्रमक आणि संघटनात्मक राजकारण करण्याची शैली

गिरीश महाजन यांची ओळख केवळ मंत्री म्हणून नाही, तर भाजपच्या 'संकटमोचक' म्हणून आहे. निवडणुकीतील मायक्रो प्लॅनिंग, विरोधकांना राजकीय उत्तर देणे, संघटना मजबूत ठेवणे आणि गरज पडल्यास आक्रमक भूमिका घेणे ही त्यांची शैली आहे.

मंगेश चव्हाण यांनीही हीच कार्यपद्धती स्वीकारली. एकनाथ खडसेंविरोधातील संघर्ष असो, जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारण; प्रत्येक वेळी त्यांनी आघाडीची भूमिका घेतली. त्यामुळे महाजन अनुपस्थित असले तरी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा राजकीय आवाज म्हणून चव्हाण पुढे येऊ लागले.

३) महाजनांचा 'राइट हँड' म्हणून तयार झालेली भूमिका

गिरीश महाजन यांच्याकडे राज्यभरातील संघटनात्मक जबाबदाऱ्या आहेत. त्यात आता नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसारखा मोठा प्रकल्पही त्यांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे खान्देशातील प्रत्येक राजकीय घडामोडीत त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती शक्य होत नाही.

अशा वेळी जळगावमधील संघटनात्मक निर्णय, सहकार क्षेत्रातील निवडणुका, पक्षातील समन्वय, स्थानिक स्वराज्य संस्थांची रणनीती आणि कार्यकर्त्यांशी संवाद या अनेक जबाबदाऱ्या चव्हाण यांनी सांभाळल्या. त्यामुळे महाजन नसतानाही भाजपचे राजकीय सत्ताकेंद्र प्रभावीपणे चालवण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वास पक्ष नेतृत्वात निर्माण झाला.

४) अंतर्गत आव्हान निर्माण होणार नाही, हा विश्वास

भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांचे स्वतःचे स्वतंत्र राजकीय गट आणि महत्त्वाकांक्षा आहेत. भविष्यात ते नेतृत्वालाच आव्हान देऊ शकतात.

मंगेश चव्हाण यांचा राजकीय उदय मात्र पूर्णपणे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्यामुळे भविष्यात स्वतंत्र सत्ताकेंद्र निर्माण करण्यापेक्षा महाजन यांच्या राजकीय वारशाला पुढे नेणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ही बाबही महाजन यांच्या निर्णयामागील एक महत्त्वाचा घटक मानली जाते.

५) निकाल देणारा नेता म्हणून निर्माण झालेली प्रतिमा

२०१९ मध्ये अल्प मताधिक्याने जिंकलेले मंगेश चव्हाण पाच वर्षांत ७० हजारांहून अधिक मताधिक्याने पुन्हा निवडून आले. जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक जिंकून त्यांनी सहकारात भाजपचे वर्चस्व वाढवले. विकासकामांसाठी मोठा निधी खेचून आणत मतदारसंघात मजबूत जनाधार निर्माण केला. यामुळे केवळ निष्ठावान कार्यकर्ता नव्हे, तर "निकाल देणारा नेता" अशी त्यांची प्रतिमा पक्षात तयार झाली. आणि हीच बाब त्यांना उत्तर महाराष्ट्रातील इतर वरिष्ठ नेत्यांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देणारी ठरली.

एकूणच, मंगेश चव्हाण यांचा राजकीय उदय हा केवळ एका आमदाराचा प्रवास नाही. गेल्या सहा वर्षांत गिरीश महाजन यांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना संघटना, सहकार, निवडणूक व्यवस्थापन आणि सत्तेच्या केंद्रस्थानी आणले. त्यामुळे "महाजनांचा वारस" ही केवळ राजकीय चर्चा राहिलेली नाही; तर उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या पुढील नेतृत्वाचा अधिकृत राजकीय संदेश म्हणून या घोषणेकडे पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT