

Jalgaon Politics : मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव येथे केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. चाळीसगाव शहरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या नियोजनातून साकारलेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे तोंडभरुन कौतुक केलं.
चव्हाण यांचे कौतुक करताना महाजनांनी केलेल्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महाजनांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगू लागली आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, मंगेश चव्हाण यांच्या रुपाने दूरदृष्टीकोन असलेला व प्रामाणिकपणे काम करणारा नेता तालुक्याला लाभला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांना आमचे सात टर्मचे आमदारकीचे रेकॉर्ड मोडायचे आहे. नुसत्या रस्ते, इमारती बांधून होत नाही, तर लोकांशी, कार्यकर्त्यांशी बांधिलकी महत्त्वाची असते. त्यामुळे मंगेश चव्हाणांमध्ये आम्ही उद्याचा जिल्ह्याचा मोठा नेता पाहत आहोत.
महाजन पुढे म्हणाले, भाजपने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली, तेव्हा त्यांची राजकीय ओळख मर्यादित होती. अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकासकामांचा धडाका लावला, ते पाहून आम्हालाही त्यांचा हेवा वाटतो आहे. चाळीसगावसाठी आम्ही त्यांची निवड केल्याचा आम्हाला अभिमान आहे. एक चांगला कार्यकर्ता, नेता, लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंगेशदादा असल्याचं महाजन म्हणाले.
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मंगेश दादामध्ये मी या जिल्ह्याचा उद्याचा नेता बघतोय. आम्ही आजून किती दिवस आहोत? सात टर्म झाल्या, आणखी एखादी-दुसरी टर्म होईल. आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कुठेतरी थांबलं पाहीजे, स्मशानात जाईपर्यंत मीच अशी भूमिका योग्य नाही. त्यामुळे आपण कुठे थांबायचं ते आपल्याला समजायला हवं. कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार आहे. त्यावेळी मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावं वाटतं," असे म्हणत महाजनांनी एक प्रकारे निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील भाजपचे सर्वाधिक प्रभावी आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते मानले जातात. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करत अनेक नवे नेतृत्व घडवले. त्यामुळे त्यांनी मंगेश चव्हाण यांचा भावी नेता म्हणून केलेला उल्लेख केवळ कौतुकापुरता मर्यादित नसून त्याला राजकीय संकेत म्हणूनही पाहिले जात आहे.
विकासकामांच्या जोरावर चव्हाण यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंगेश चव्हाण यांच्यात आपल्याला राजकारणात ओव्हरटेक करण्याची असलेली क्षमता लक्षात घेता महाजनांनी हे वक्तव्य केलं का? अशाही चर्चा रंगल्या असून, भविष्यात जळगाव जिल्ह्यात महाजन यांच्या राजकीय वारशाचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून चव्हाण यांच्याकडे पाहिले जाऊ लागल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.