Gulabrao Patil  Sarkanama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil : शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजपला चिमटा; 'श्रीरामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करू नका...'

Gulabrao Patil News : शिवसेनेच्या मंत्र्यांनी टोचले भाजपाचे कान...

Arvind Jadhav

Nashik News : अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचा भारतीय जनता पार्टी इव्हेंट करीत असल्याची टीका विरोधकांकडून होत असताना आता तर सत्तेतील शिवसेनेचे मंत्री गुलाब पाटील यांनीही भाजपाला चिमटा काढला आहे. 'रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करू नका. राम सर्वांचा आहे. अयोध्या येथे राम मंदिर व्हावे, यासाठी आम्ही तीन भाऊ जेलमध्ये गेलो होतो,' असे म्हणत भाजपाच्या मंत्र्यांसमोरच पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि शिवसैनिकांचे पटेनासे झाले आहे. एकमेकांविरोधात उघड आरोप केले जात असून, आगामी निवडणुकीवर याचे काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी नेहमीच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात उघड तक्रारी करू लागले आहेत. मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लुडबुडीतून वाद वाढू लागले आहेत. आता तर मंत्री गुलाबराव पाटील यांनीसुद्धा भाजपाचे कान टोचलेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातील तिन्ही पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी महायुतीने राज्यभर मेळावे सुरू केले. जळगावमध्ये सेनेने भाजपाविषयी असलेला राग व्यक्त करण्याची संधी सोडली नाही. आम्ही बंड केले नसते, तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का? असा खोचक सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. शिंदे गटाचेच आमदार किशोर पाटील यांनीही आपली नाराजी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने जाणीव ठेवावी

'तुमच्या वेळी सर्व बरोबर होते आणि आमच्या वेळेला गडबड होते. शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत गेलो. त्याचा आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला काय त्रास सहन करावा लागला, हे आम्हालाच माहिती आहे. आमचं काय होईल, हे माहीत नसताना आम्ही धोका पत्करला तुमच्यासोबत आलो. त्यामुळेच भाजपा सत्तेत आला याची जाणीव ठेवायला हवी,' अशा शब्दांत पाटलांनी आपली नाराजी व्यक्त केली.

आम्हीच युतीधर्म पाळायचा का? किशोर पाटील यांचा सवाल...

सेनेचे आमदार किशोर पाटील सुरुवातीपासून मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी यापूर्वी मंत्री गुलाब पाटील यांच्याकडे व्यक्तसुद्धा केली होती. मात्र, महायुतीच्या मेळाव्यादरम्यान आमदार पाटील यांनी जाहीरपणे भाजपावर तोंडसुख घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजप युती आहे. शिवसेनेनं कधीही गद्दारी केली नाही. माझ्या उमेदवारीच्या वेळी एका अपक्ष उमेदवाराला पुढे करण्यात आले. एवढंच काय, तर नंतर त्याला भाजप तालुकाध्यक्ष बनवण्यात आलं. बाजार समिती निवडणुकीमध्येही युती धर्म निभावायला हवा होता, पण त्यावेळी साथ दिली नाही, अशा शब्दांत आमदार पाटलांनी भाजपबद्दलची नाराजी व्यक्त केली.

Edited By : Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT