Smita Wagh  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon BJP Politics : भाजप दुसऱ्यांदा स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलणार का? 'हे' आहे कारण

Sampat Devgire

Jalgaon Loksabha 2024: माजी खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने जळगाव लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे भाजप नेते सावध झाले आहेत.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात भाजप मुख्य प्रवाहात आहे. बहुतांशी सत्ता केंद्र त्यांच्या ताब्यात आहेत. या जिल्ह्याची सर्व सूत्रे भाजप नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हलवतात. महाजन हे लहरी स्वभावाचे असून, उमेदवारी देताना ते अनेकांना डावलतात, अशा तक्रारी आहेत.

यंदाही त्यांनी प्रारंभापासून जळगावच्या उन्मेष पाटील आणि रक्षा खडसे या दोन्ही खासदारांना उमेदवारी नाही, अशी हवा केली होती. महाजन यांच्या या कामकाजामुळे भाजपचे अनेक नेते वचकून असतात. त्याची परिणिती सध्याच्या लोकसभा निवडणुकीत दिसू लागली आहे.

भाजपने जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी न देता स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी भाजपच्या विरोधात पर्यायी रणनीती आखली. त्यांनी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आणि आपले मित्र करण पवार (Karan Pawar) यांच्यासह शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाकडून लगोलग त्यांच्या संभाव्य उमेदवार ललिता पाटील यांचे नाव बाजूला ठेवण्यात आले. शिवसेनेने करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे जळगावमधील एकतर्फी वाटणारी लढत अचानक चुरशीने झाली. भाजपला शिवसेना ठाकरे गटाचे मोठे आव्हान उभे राहिले.

त्याचे पडसाद भाजपमध्ये उमटले आहेत. याबाबत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जळगावचे माजी खासदार जे टी महाजन यांच्याशी गिरीश महाजन यांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली. शिवसेनेचे करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघासाठी तयारी देखील केली होती. त्यामुळे त्यांचा एरंडोल, पारोळा आणि भडगाव भागात मोठा संपर्क आहे. पारोळ्यातून त्यांना अनुकूल वातावरण आहे. हा भाजपच्या उमेदवाराला मोठा धोका संभवू शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

करण पवार यांच्या विजयाचा विडा माजी खासदार उन्मेष पाटील यांनी उचलला आहे. मतदारसंघातील बदललेल्या या राजकारणाचा आढावा घेऊन नवा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये पुन्हा एकदा स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 2029 मध्येदेखील श्रीमती वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली होती. ऐनवेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ती बदलली. त्याची यंदा पुनरावृत्ती होणार का असे बोलले जाते.

भाजप नेते आणि माजी खासदार जे टी महाजन हेदेखील पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. ते दहा वर्षे खासदार होते. चाळीसगाव येथेही त्यांचे नातेगोते आहे. त्यामुळे शिवसेनेचे करण पवार यांना त्यांच्या पारोळा मतदारसंघातच अडकविण्यात भाजप यशस्वी होऊ शकतो या सर्व राजकीय डावपेचात स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्यावर पुन्हा एकदा अन्याय होतो की काय,अशी स्थिती निर्माण झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT