Jalgaon Munciple corporation Building, Jalgaon News, Jalgaon Latest Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Mayor: महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा, भाजपच्या महिला महापौरांची गाडी जप्त होता होता राहिली, नेमकं काय घडलं?

Jalgaon Mayor Vehicle Seizure, Jalgaon Municipal Corporation, Deepmala Kale: जळगाव महापालिकेने भूसंपादनाची भरपाई न दिल्याने न्यायालयाने महापौर आणि आयुक्तांच्या वाहन जप्तीचे आदेश दिले. २५ लाखांची रक्कम भरल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांची गाडी जप्तीपासून वाचली.

Sampat Devgire

Jalgaon Municipal Corporation: जळगाव शहराच्या भारतीय जनता पक्षाच्या महापौर दीपमाला काळे विविध उपक्रमांनी नागरिकांत नेहमीच चर्चेत असतात. मात्र महापालिकेच्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि स्थिती यामुळे त्या नुकत्याच अडचणीत आल्या. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना चांगलीच धावपळ करावी लागली.

जळगाव शहरातील विकास आराखड्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी महापालिकेने खाजगी जमीन ताब्यात घेतली होती. २०१० मध्ये जमीन भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली. मात्र महापालिकेचे प्रशासन जमीन ताब्यात आल्यावर पुढची जबाबदारी विसरून गेले.

जळगाव महापालिकेने २०१० मध्ये शहरातील भूमापन क्रमांक ५१२ आणि ५११ ही जमीन डीपी रोड साठी ताब्यात घेतली होती. भूसंपादनाची कारवाई केल्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. रस्ता पूर्ण होऊन तो वापरातही आला. मात्र संबंधित जमिनीचे पैसे देण्यास महापालिकेने टाळाटाळ केली.

संबंधित जमीन मालकांनी पाठपुरावा केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने भूसंपादन केल्याचे चाळीस लाख रुपये अदा करण्याचे आदेश दिले होते. विलंब झाल्यास त्यावर १५ टक्के व्याज देण्याचा आदेश होता.

या आदेशानंतर जळगाव महापालिकेने पैसे देण्यात विलंब केला. त्यामुळे जमीन मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर जळगाव महापालिकेने पैसे देण्याचे लिखित आश्वासन दिले होते. ते आश्वासन देखील पाळण्यात आले.

न्यायालयाचा अवमान झाल्याने उच्च न्यायालयाने नुकतेच दोन कोटी २३ लाख रुपये अदा करण्याचा आदेश महापालिकेला दिला होता. हे पैसे देण्यात महापालिका अपयशी ठरल्याने महापौर आणि आयुक्तांच्या वाहनाची जप्ती करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.

या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी ॲड एन. आर. लाठी थेट महापालिकेत पोहोचले होते. त्यामुळे वाहन जप्तीची कार्यवाही करताना महापौर आणि आयुक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. वरिष्ठांनी याबाबत हस्तक्षेप करीत मुदतवाढ मागून घेतली. २५ लाख रुपये अदा केल्यानंतर उर्वरित रक्कम एक महिन्याचा आत देण्याचे आश्वासन दिल्याने महापौरांची गाडी जप्त होता होता राहिली.

सोन्या चांदीची बाजारपेठ आणि श्रीमंत महापालिका असा दावा जळगाव महापालिकेबाबत केला जात होता. पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र मात्र भूसंपादन केलेल्या जमिनीचे पैसे देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे आयुक्त आणि महापौरांची वाहने जप्त करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली. त्यात महापौर दीपमाला काळे यांना आपले वाहन जप्त होण्यापासून वाचविताना अक्षरशः वकिलांसमोर हात जोडण्याची वेळ आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT