Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध; नियोजन समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय आमदारांचा ठराव

Pradeep Pendhare

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता खूप आहे. यातच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाला नगर जिल्ह्यातून राजकीय नेत्यांनी विरोध केला आहे. या विरोधाचे पडसाद आज नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पडसाद उमटले. नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी एकत्रिपतणे जायकवाडीला पाणी न देण्याचा एकमुखी निर्णय घेतला.

तसा ठराव मंजुर करण्यात आला असून, तो राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय झाल्याची माहिती राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यातच जायकवाडीला नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचा आदेश झाला आहे. या आदेशाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना विरोध केला आहे. या आदेशाचे पडसाद आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले. जायकवाडीला पाणी न सोडण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बाजू लावून धरली. काही नेत्यांनी या आदेशाविरोधात न्यायालयात देखील धाव घेतली आहे. यावर न्यायालयात 21 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रामुख्याने आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे, आमदार किरण लहामटे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह खासदार सुजय विखे आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले.

जायकवाडीला पाणी सोडू नये, असा ठराव मांडला. यानंतर सभागृहात तो सर्व पक्षीय नेत्यांनी मंजूर केला. हा ठराव आता राज्य सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

नगर जिल्ह्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. तो आम्ही सर्व राजकीय नेत्यांना एकत्रित येवून घेतला आहे. या निर्णयामुळे नगर जिल्ह्याला अधिक प्रमाणात आवर्तन मिळणार आहे. तसे आम्ही नियोजन करू, असेही पालकमंत्री विखे यांनी सांगितले.

गोदावारीतून 2 डिसेंबरला, मुळा धरणातून 10 डिसेंबरला, तर प्रवरातून 11 डिसेंबरला आवर्तन सोडण्यात येणार आहे. 15 डिसेंबरपर्यंत निळवंडे कॅनॉलची चाचणी पूर्ण होईल. यानंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेऊन प्रत्यक्षात कार्यवाहीचे नियोजन करणार असल्याचेही पालकमंत्री विखे यांनी सांगितले.

प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

नगर जिल्ह्यात पर्यटनाला खूप चालना देण्यात आली आहे. राज्य सरकारकडे तसे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती बसवण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाला जागेसंदर्भात तशा चाचपणी करण्याच्या सूचन केल्या आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यात पुतळा उभारण्यासाठी एक कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन असणार आहे.

तसेच नगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला लष्कराकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत होण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. तत्पूर्वी भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी 95 कोटी रुपयांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील 138 शाळा खोल्यांसाठी जिल्हा नियोजनातून बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. अतिरीक्त 34 शाळा खोल्या बांधकामास लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा दहा कोटींचा निधी शाळा बांधकामावर खर्च करण्यात येणार असल्याचीही माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

ज्ञानेश्वर महाराजांची सृष्टी शिल्प उभारणार

नगर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत त्यांचेच सृष्टी शिल्प उभारण्यात येणार आहे. तसा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक होण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

त्यावर देखील निर्णय झाला आहे. नगर जिल्ह्यातील शासकीय शाळांचे वीज थकबाकीपोटी वीज जोडणी तोडण्याची कारवाई होते. ही मार्चपर्यंत थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या शाळांचे वीजबिल देखील भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT