Political News: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही उभी फूट पडली. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले, तर मध्यंतरी देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच फडणवीसांना दिल्लीत बोलावले जाणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, आता फडणवीसांनी या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "मी विधानसभा निवडणूक लढवणार आणि तेही नागपूरमधूनच लढवणार," अशी माहिती फडणवीसांनी स्वत:च दिली आहे. एका कार्यक्रमात अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी ही माहिती सांगितली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"पुढील 10 वर्षांनंतरदेखील मी भाजपमध्येच काम करेल आणि पक्ष सांगेल तिकडे करेल," असेही फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यावेळी भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या मतभेदामुळे फडणवीसांना सत्ता स्थापन करता आली नाही.
दरम्यान, आता आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवल्या जाणार असल्याचे फडणवीसांनी अनेकदा सांगितले आहे, तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने 'मिशन 45'चा संकल्प केला आहे.
त्यामुळे या वेळी सरकारमध्ये असलेल्या भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) लोकसेभेला आणि विधानसभेला किती जागा लढवतात ? तसेच भाजप किती जागा लढवणार, युतीमधील मित्र पक्षांना किती जागा देणार? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे, तर देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चांवर त्यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिल्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.