Kanifnath Temple, Madhi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kanifnath Temple Madhi: कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट बरखास्त करा; मढी ग्रामसभेने का केली मागणी ?

Pradeep Pendhare

Ahmednagar News: पाथर्डीतील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी मंदिरासमोर केलेल्या हाणामारीचे पडसाद नाथ भक्त आणि ग्रामस्थांमध्ये उमटले आहेत. विश्वस्तांच्या या प्रकारातून भक्तांच्या धार्मिक भावना दुखवल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच मढी येथे ग्रामसभा झाली. यात मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून चांगल्या प्रशासकाची नेमणूक करावी, असा ठराव मढी ग्रामसभेत घेण्यात आला.

मढी देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, माजी अध्यक्ष सचिन मरकड, माजी विश्वस्त उत्तम मरकड आणि ग्रामस्थ या सभेत सहभागी झाले होते. यावेळी मरकड म्हणाले, 'मढी देवस्थान येथे झालेल्या हाणामारीमुळे न्यास व मरकड कुटुंबियांची मोठी बदनामी झाली. भाविक आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे.

सध्या कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी लागली असून दोषी विश्वस्तांवर गुन्हे दाखल होणार आहेत. विश्वस्तांच्या वादामुळे भाविक भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा व दैनंदिन पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रम, अन्न छत्रालय, लाडू प्रसाद, दळणवळणाच्या सुविधांवर दूरगामी परिणाम झाले आहेत,' असे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विश्वस्तामध्ये अध्यक्षपदासाठी हाणामाऱ्या करणाऱ्या विश्वस्तांना देवस्थानचा कारभार पाहण्याचा अधिकार नाही. ग्रामसभेचा ठराव घेऊन तात्काळ नगर व पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांत कारवाई न झाल्यास ग्रामस्थांना घेऊन नगर येथील धर्मादय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती सचिन मरकड यांनी यावेळी दिली.

मढी पाणी योजनेला लोकप्रतिनिधींचा विरोध

'मढी देवस्थानच्या दानपेटीमधील पैशांची या विश्वस्तांनी अफरातफर केली आहे. भ्रष्टाचार मी उघड करेल, अशा भीतीने माझ्यावर जीवघेणा हल्ला करून मला संपवण्याचा प्रयत्न होता. भाविकांना व ग्रामस्थांना पिण्याचे पाण्याची सुविधा व्हावी, यासाठी कासार पिंपळगाव ते मढी पाणी योजनेला स्थानिक लोकप्रतिनीधीनी विरोध केला', असा आरोप संजय मरकड यांनी ग्रामसभेत केला. अनेक घटनाबाह्य निर्णयामुळे विश्वस्त मंडळी वादाच्या भोवऱ्यात अडकली असून सध्या देवस्थान ट्रस्टचे कामकाज ठप्प झाले आहे. यावर ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन तोडगा काढावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

प्रशासक नेमण्याची मागणी

नाथ पूजा विधीचा मान सुरुवातीपासूनच मरकड कुटुंबीयांना आहे. विश्वस्त मंडळांनी घटनेत बदल करून मरकड कुटुंबातील सहा व इतर पाच विश्वस्त मढी गावातील घेतले पाहिजे, अशी मागणी अनेक ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणुकीची सूचना सचिन मरकड यांनी मांडली असून, त्याला अनुमोदन दीपक साळवे यांनी दिले.

हाणामारीप्रकरणी 25 जणांचे जबाब

श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांमधील दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये पाथर्डी पोलिसांनी एकूण 25 जणांचे जबाब नोंदवले असून उर्वरित अजूनही काही लोकांचे जबाब घेणे बाकी आहे. 14 डिसेंबरला अध्यक्ष पदावरून विद्यमान अध्यक्ष संजय मरकड व सहसचिव शिवजीत डोके यांच्या गटात वाद झाला. यामध्ये दोन्ही गटाकडून परस्परांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.

त्यानंतर दोन्ही गटांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप प्रत्यारोप केले. दरम्यान, कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून याविषयी माजी विश्वस्त रमाकांत मरकड यांनी धर्मादाय आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. त्यासंदर्भात धर्मादाय आयुक्त कार्यालयाने चौकशी समिती नेमली असून यामध्ये तक्रारदार, सर्व विश्वस्त मंडळ व व्यवस्थापक यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT