Bhusaval News : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी भुसावळ येथे सभा पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित केले. या सभेला परिसरातून चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. मात्र या सभेमध्ये फडणवीस आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे एकाच मंचावर येण्याचा प्रसंग टळला. (Lok Sabha Election 2024)
भुसावळ येथे होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे एकमेकांचे कट्टर विरोधक एका व्यासपीठावर येण्याची संधी होती. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे दोन बडे नेते एका व्यासपीठावर येणार, यामुळे या सभेची मोठी उत्सुकता होती. मात्र प्रत्यक्ष सभा झाली तेव्हा व्यासपीठावर खडसे विरोधकांची मांदियाळी दिसली. खडसे मात्र सभेला फिरकलेच नाहीत. त्यामुळे खडसे आणि फडणवीस एकत्र येऊ शकले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार आहेत. रक्षा खडसे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात असूनही एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी या निवडणुकीच्या तोंडावर स्वगृही भारतीय जनता पक्षात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय प्रामुख्याने दिल्लीतील नेत्यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आला. राज्यातील नेत्यांना मात्र त्याबाबत फारसे अवगत करण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत वक्तव्य करणे आतापर्यंत टाळले आहे.
भुसावळ येथील सभेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधित केले. या वेळी खडसे यांचे कट्टर विरोधक मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. विशेष म्हणजे खडसे आणि मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे आमदार पाटील खडसे यांच्या प्रचारापासून अलिप्त होते. त्यांना प्रचारात सक्रिय करण्यासाठी भाजप नेत्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन आणि आमदार पाटील व्यासपीठावर असताना खडसे यांना कितपत राजकीय स्पेस मिळाली असती, हा देखील वादाचा विषय आहे. मात्र खडसे यांचा भारतीय जनता पक्ष अधिकृत प्रवेश झालेला नाही. त्यामुळे ते या सभेला उपस्थित राहू शकले नाही. हे कारण खडसे यांच्या अनुपस्थितीसाठी पुढे करण्यात आले आहे.
रावेर लोकसभा (LOK Sabha) मतदारसंघात येत्या 13 मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. खडसे सध्या यावर मुक्ताईनगर, चोपडा या विधानसभा मतदारसंघात व्यक्तिगत गाठीभेटी घेत प्रचार करीत आहे. त्यामुळे खडसे भाजप उमेदवाराचा प्रचार करीत असले तरीही त्यांचा अधिकृत प्रवेश केव्हा होणार? हा चर्चेचा विषय आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.