Eknath Shinde, Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : नाशिकवर भाजपच्या दाव्याने शिंदे गट आक्रमक; पदाधिकाऱ्यांचा थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच इशारा

Hemant Godse News वर्षा बंगल्यावरील महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक मतदारसंघ आणि उमेदवाराबाबत निर्णय घेणार

Sampat Devgire

Nashik Political News : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीच हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे. खासदार गोडसे यांनी मतदारसंघात प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण केली आहे. मात्र अचानक महायुतीतील अन्य घटक पक्ष शिंदे गटाच्या मार्गात अडथळा निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला यावरून नवा वाद सुरू झालेला आहे.

शिंदे गटाच्या जागावाटप, उमेदवारांबाबत रविवारी (ता. 24) मुंबईतील शासकीय वर्षा या निवासस्थानी बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यावेळी शिंदे गटाचे मतदारसंघ आणि उमेदवार दोन्हींचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नाशिकबाबत महायुतीत सुरू झालेल्या तिढ्यानंतर शिंदे गटाचे खासदार गोडसेंसह पदाधिकरी वर्षावर पोहोचले आहेत. त्यांनी नाशिक आपल्याकडेच ठेवण्याचा चंग बांधल्याने मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय देणार, याकडे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, महायुतीतील भाजपकडून सहकारी पक्षांच्या बहुतांशी मतदारसंघांवर सातत्याने दावा केला जात आहे. यामध्ये नाशिक मतदारसंघाचा प्रामुख्याने समावेश आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) संपर्क मंत्री गिरीश महाजन यांपासून तर विविध नेत्यांकडे आक्रमकपणे या मतदारसंघावर दावा केला आहे. नुकतेच पक्षाचे निरीक्षक विजय चौधरी यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन देखील केले होते. त्यामुळे नाशिकमधील शिंदे गट अस्वस्थ आहे.

याबाबत गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. नाशिकचे मतदारसंघ शिंदे गटालाच सोडण्यात यावा. विद्यमान खासदार असताना भाजप याबाबत दबाव निर्माण करीत असल्याने महायुतीच्या सहकारी पक्षात तणाव निर्माण होत आहे. अशी तक्रार यापूर्वी करण्यात आली आहे.

आता येथील विविध पदाधिकारी तातडीने मुंबईला रवाना झाले. नाशिक मतदारसंघ शिंदे गटाचाच आहे. वर्षा येथील बैठकीत ही भूमिका आक्रमकपणे मांडली जाईल. मतदारसंघ शिंदे गटाला न मिळाल्यास काही कार्यकर्त्यांनी टोकाचे निर्णय घेऊ, असा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे नाशिकच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस राजकीय तणावाचा ठरला आहे.

राज्यातील जागावाटप आणि उमेदवार या संदर्भात मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील. त्यामुळे जे जे मतदारसंघ शिंदे गटाकडे आहेत. तेथील पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलविण्यात आले आहे. त्यामुळे खासदार गोडसे यांच्यासह त्यांचे समर्थक आणि नाशिकचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT