MKP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : लाल वादळाची लोकसभेत दिशा कोणती? 'माकप' पुन्हा नव्या जोमाने मैदानात...

Arvind Jadhav

Nashik : शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या प्रलंबीत मागण्यांसाठी माकप (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) ने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक आंदोलनकर्ते रस्त्यावर ठाण मांडून आहेत. मागील लोकसभा निवडणुकीवेळी माजी आमदार जे. पी. गावित यांनी असेच आंदोलन मुंबईला नेले होते.

यातून निर्माण झालेल्या लाटेत स्वार होण्याचा प्रयत्न गावित यांच्याच अंगलट आला. लोकसभेतील पराभवानंतर त्यांना विधानसभेवर पाणी फेरावे लागले. तसेच माकपच्या उमेदवारीचा भाजपलाही फायदा झाल्याचा आतबट्टा लागला. आता पुन्हा नव्या जोमाने माकप मैदानात उतरली असून, यावेळी त्यांची दिशा कोणती राहणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

आंदोलनकर्ते नाशिक (Nashik) मध्ये पोहचण्यापूर्वीच जे. पी. गावित यांची पालकमंत्री दादा भुसे यांनी समजूत घातली. मात्र, सरकारवर आमचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करीत गावित यांनी आंदोलन करण्याची ठाम भूमिका घेतली. त्यानुसार जवळपास दहा हजार आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासह समोरील सीबीएस रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. पालकमंत्री अधिवेशनासाठी मुंबईला गेले असून, या आंदोलनावर तोडगा कसा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गत लोकसभा निवडणुकींच्या (Loksabha Election) तोंडावरच माकपने थेट नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास करून आंदोलन केले होते. यानंतर राजकीय पटलावर काही घडामोडी जलद गतीने घडल्या होत्या. त्याची चर्चा आजही होते. मुंबईतील आंदोलनानंतर जे. पी. गावित (J P Gavit) यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.

थेट भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत असताना तिथे माकप उतरली. परिणामी राष्ट्रवादीची मते फुटून भाजपला फायदा झाला. निवडणुकीपूर्वी याबाबत चर्चा असताना गावित थांबले नाहीत. परिणामी माकपची थेट भाजपला मदत झाल्याची चर्चा सुरू झाली. पुढे विधानसभेतही माकपला आपला गड गमवावा लागला.

आदिवासी पट्ट्यातील गमावलेली ताकद पुन्हा मिळवण्यासाठी माकपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कांदा निर्यात बंदी, कंत्राटी भरती, आदिवासी जमिनी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या बिऱ्हाड आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तुर्तास माकपला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बरोबर घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, शरद पवार गटालाही सक्षम उमेदवाराचा पर्याय अद्याप सापडलेला नाही.

त्यामुळे महाआघाडीतही जागा थेट माकपला द्यावी, असा एक पर्याय चाचपडून पाहिला जातो आहे. गावितांसाठी ही एक चांगली संधी असून, लोकसभेचे गणित बसलेच नाही तर महाआघाडीतून कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघ सुरक्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे हत्यार आणखी धारदार बनवण्याचा प्रयत्न गावित करतील काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT