Nagar News : सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था मानल्या गेलेली महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्यावरून राजकारण तापलं होतं. महानंदाच्या रूपाने आणखी एक प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अखेर मंगळवारी महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सहकारी दूध महासंघ ( महानंद ) या दुग्ध व्यवसायातील व सहकारातील शिखर संस्थेच्या संचालक मंडळाची १३ वी बैठक २० फेब्रुवारी २०२४ रोजी चर्चगेट ( मुंबई) येथील एन.के.एम. कार्यालयात झाली. महानंदची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. त्यातून दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांचे हितसंवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून दूध महासंघाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतर करण्याचे नियोजन झाले आहे.
याबाबतचा विस्तृत डीपीआर रा.दु. वि. मंडळाने तयार केला आहे. त्यांनी शासन व महानंदला सादर केलेल्या प्रस्तावानुसार २५३.५७ कोटी इतकी रक्कम शासनाकडून मदत, soft loan किंवा भागभांडवल स्वरूपात देण्याचा प्रस्ताव देण्यात यावा, असा निर्णय झाला. यातून कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती तसेच महानंदची विद्यमान यंत्रणा/व्यवस्था वर्धित करण्यासाठी हा निधी आवश्यक आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रा.दु.वि. मंडळाच्या अहवालानुसार विद्यमान संचालक मंडळ हे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या कारभारात हस्तक्षेप करणे अपेक्षित नाही, यास्तव बैठकीत महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, आमदार माणिकराव कोकाटे व इतर १५ असे एकूण १७ संचालकांनी संचालक पदाचे राजीनामे राज्य सहकारी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक कान्हुराज बगाटे यांचेकडे सुपूर्त केले.
संचालक मंडळ नको असल्याची अट
महानंदची राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणंद या संस्थेकडे पुनरुज्जीवन प्रक्रिया सुरू आहे. दूध महासंघाचे तसेच राज्यातील सहकारी जिल्हा / तालुका संघ, प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादक यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी महासंघाच्या संचालक पदाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात संचालकांनी नमूद केले आहे.
महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्यासाठी महत्त्वाची अट संचालक मंडळ नसल्याबाबतची होती. आता संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.