Maratha Protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंबाबत वादग्रस्त पोस्टच्या निषेधार्थ गावबंद; महिला सरपंच कुटुंबासह गायब

Ahmednagar Police: एमआयडीसी पोलिसांनी परिस्थिती अंदाज घेत पोलिस बंदोबस्त वाढवला

Pradeep Pendhare

Ahmednagar News: मराठा आरक्षणासाठी संघर्ष उभारलेले योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी शेंडी (ता.नगर) येथे तणाव वाढला असून महिला सरपंचाने केलेल्या पोस्टचा मराठा समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.

या निषेधार्थ शेंडी गावात बंद पुकाण्यात आला होता. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. तर परिस्थिती चिघळायला नको म्हणून एमआयडीसी पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, संबंधित महिला सरपंच आणि तिचे कुटुंब गावातून गायब झाले आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे हे आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूने प्रत्युत्तर दिले जात आहे. यातून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मराठा-ओबीसी समाजाचा संघर्ष आता गाव पातळीवर येवून पोहचला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण? असा प्रश्न केला जात होता. हाच धागा पकडून सकल मराठा समाजाच्यावतीने समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल केल्या होत्या. याच पोस्ट खाली शेंडी (ता.नगर) येथील महिला सरपंचाने वादग्रस्त विधान करणारे उत्तर दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणी सीताराम दाणी यांच्या तक्रारीवरून महिला सरपंचाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला. परंतु महिला सरपंचाच्या या पोस्टवरून वाद उफळला आहे. आज शेंडी-पोखर्डी बंदची सकल मराठा समाजाने हाक दिली. सकल मराठा समाज आज सकाळपासून शेंडी गावातील चौकात जमला होता. व्यवहार बंद ठेवले होते. यावेळी चौक सभा झाली आणि महिला सरपंचाने केलेल्या पोस्टचा तीव्र निषेध करण्यात आला.

पोखर्डी, कापुरवाडी, पिंपळगाव माळवी, इमामपूर येथील ग्रामस्थ शेंडी गावात आले होते. यानंतर गावातून फेरी काढण्यात आली. संबंधित महिला सरपंचाच्या फलकाला काळे फासण्यात आले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्धार यावेळी सकल मराठा समाजाने केला. एमआयडीसी पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.

सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी करण्यात आली. पुढील 15 दिवसांत संबंधित महिला सरपंचाविरोधात न्यायालयाकडे कारवाईचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे आश्वासन सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी शेंडीतील सकल मराठा समाजाला दिले.

मनोज जरांगेंची तोफ नगर उत्तरेत धडाडणार ?

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे सुरू आहे. पूर्वी त्यांचा नगर दक्षिणचा दौरा झाला आहे. आता नगर उत्तरेत त्यांचा दौरा होत आहे. श्रीरामपूर आणि संगमनेरमध्ये त्यांची 22 नोव्हेंबरला सभा होणार आहे. श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर सायंकाळी सहा वाजता सभा होणार आहे. या सभेची सकल मराठा समाज्यावतीने जोरदार तयार सुरू आहे.

ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने श्रीरामपूरसह आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका सुरू आहे. श्रीरामपूर अगोदर संगमनेरमध्ये जाणता राजा मैदानावर दुपारी तीन वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होईल.

या सभेची देखील जोरदार तयारी सुरू आहे. तसेत शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता साई लाॅन्स येथेही सभा होणार आहे. या तिन्ही सभेत मनोज जरांगे पाटील कोणावर निशाणा साधणार, त्यांची शाब्दिक तोफ कोणाच्या दिशेने धडाडणार याची उत्सुकता आहे.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT